इचलकरंजी : शहरास स्वच्छ व मुबलक पाण्याचा शाश्वत पुरवठा करणारी काळम्मावाडी धरणाची नळ योजना राबविण्यासाठी दीर्घ कालावधी लागणार आहे. दरम्यान, दूधगंगा नदीतून पाणी आणणारी योजना राबविण्यासाठी आजी-माजी खासदार व आमदारांसह व्यापक बैठक आयोजित करून निर्णय घ्यावा, अशा आशयाचा प्रस्ताव नगरपालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे होत्या.इचलकरंजी शहराचा समावेश सरकारच्या अमृत योजनेत करण्यासाठी काळम्मावाडी धरणातून थेट नळाद्वारे पाणी आणणारी योजना रद्द करून त्याऐवजी सुळकूड (ता. कागल) येथून दूधगंगा नदीचे पाणी आणणारी नळ योजना राबवावी. हा विषय सभेच्या सुरुवातीलाच कॉँग्रेस पक्षाने उपस्थित केला. या विषयावर बोलताना नगरसेवक शशांक बावचकर, बाळासाहेब कलागते, उपनगराध्यक्ष रणजित जाधव, संभाजीराव काटकर यांनी पालिकेच्या सभागृहाला विश्वासात न घेता प्रशासनाने शासनाला परस्पर दूधगंगा नळ योजनेचा पर्याय सुचविल्याबद्दल धारेवर धरले. याला राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांनीही साथ दिली.यावर बोलताना शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव यांनी प्रशासनाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. काळम्मावाडी धरणातून थेट नळाद्वारे पाणी आणणारी योजना ५५० कोटी रुपयांची आहे. ती कार्यान्वित करण्यास दीर्घ कालावधी लागेल. दरम्यान, शहराची वाढीव पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी दूधगंगा नदीतून पाण्याची योजना राबवावी लागेल. म्हणून ‘अमृत’ योजनेच्या चर्चेवेळी शासनाला दूधगंगा योजना सुचविली आहे, असे जाधव यांनी सांगितले. त्यावर कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी हा बदल परस्पर सुचविण्यासाठी प्रशासनाला सांगणारा कोण, असा प्रश्न विचारला; पण त्याचे उत्तर मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी टाळले. सुमारे तासाभराच्या चर्चेनंतर याप्रकरणी व्यापक बैठक बोलविण्याचा तोडगा ‘शविआ’चे जाधव यांनी सुचविला. तरीही बावचकर यांनी, काळम्मावाडी योजनेचा प्रकल्प अहवाल तयार करणे व तांत्रिक मंजुरीसाठी खर्च झालेल्या ६१ लाख रुपयांची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित केला.नगरपालिकेच्या सध्याच्या प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सभागृह बांधण्याचे काम प्रस्तावित आहे. या सभागृहाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचे एकमताने ठरविण्यात आले. नगरपालिकेच्या विविध प्रकारच्या वाहनांकडे मक्तेदारी पद्धतीने चालक घेण्याचा मक्तासुद्धा शुक्रवारच्या सभेत मंजूर करण्यात आला. अशा प्रकारे एकूण वीस विषयांवर चर्चेने निर्णय घेण्यात आले. (प्रतिनिधी)
पाणी योजनेसाठी व्यापक बैठक घ्या
By admin | Published: September 18, 2015 10:41 PM