आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. ८ :श्री महालक्ष्मी मंदिरातील सध्याच्या स्थितीविषयी धर्माचार्यांचे मत घेऊन अंतिम निर्णय आणि आचारसंहिता सिद्ध करावी. शिर्र्डी, पंढरपूरच्या धर्तीवर सरकारी पुजारी नियुक्त करण्याविषयी घाईघाईने निर्णय न घेता धर्माचे अभ्यासक, इतिहास संशोधक आणि शंकराचार्य यांची बैठक आयोजित करावी, अशी मागणी शुक्रवारी श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचार विरोधी कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे करण्यात आली.
केवळ पुरोगामी आणि नास्तिकवादी विचारवंत यांचाच विचार, श्रीपूजकांना हटविणे, मंदिरातील प्रथा, परंपरांमध्ये बदल करणे, या सर्व गोष्टींविषयी एकांगी निर्णय घेऊ नये, ‘श्री महालक्ष्मी’ की ‘अंबाबाई’ हे नाव ठरविण्यासाठी आणि शिर्डी, पंढरपूरच्या धर्तीवर सरकारी पुजारी नियुक्त करण्याविषयी घाईघाईने निर्णय न घेता धर्माचे अभ्यासक, इतिहास संशोधक आणि शंकराचार्य यांची बैठक आयोजित करून अभ्यासाअंती निर्णय घ्यावा. या संदर्भात एकांगी, नास्तिकवादी, पुरोगामी आणि राजकीय लोकांच्या दबावाला बळी पडून घाईने कोणताही एकांगी निर्णय घेऊ नये. सर्वांचे म्हणणे ऐकूण घेऊन या प्रकरणास न्याय मिळावा.
सध्याच्या स्थितीवरील निर्णयासंदर्भातील अनेक ऐतिहासिक, पौराणिक प्राथमिक टप्प्यातील दस्तऐवज आणि कागदपत्रे या निवेदनासोबत दिली आहेत. तसेच आवश्यकतेनुसार वेळोवेळी अनेक पुरावे सादर करण्यात येतील, असे या निवेदनात म्हटले आहे. या वेळी जिल्हाधिकारी सुभेदार यांनी समितीचे म्हणणे मांडले आहे. ते सर्व नोंद करून शासनाकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले.
शिष्टमंडळात सुनील घनवट, संभाजी साळुंखे, महेश उरसाल, राजेंद्र सूर्यवंशी, शरद माळी, सुनील पाटील, प्रमोद सावंत, सुधाकर सुतार, अवधूत भाट्ये, मनोहर सोरप, मधुकर नाझरे, आदींचा समावेश होता. कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचार विरोधी कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन देण्यात आले.