VidhanSabha Election: कोल्हापुरात काँग्रेसकडे आठ जागा घ्या, पुण्यातील बैठकीत सतेज पाटील यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 11:56 AM2024-09-05T11:56:54+5:302024-09-05T11:58:10+5:30
दहाही मतदारसंघांचा घेतला श्रेष्ठींनी आढावा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आठ मतदारसंघांत काँग्रेस पक्षाने तयारी केली आहे. या जागा पक्षाकडे घ्या, असा आग्रह काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी धरला.
पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांची आढावा बैठक बुधवारी पुण्यात काँग्रेस कार्यालयात झाली. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघांतील इच्छुक उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील आदी उपस्थित होते.
दहा विधानसभा मतदारसंघांच्या वतीने आमदार सतेज पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढली असून दहापैकी आठ जागा लढण्याची आपली तयारी आहे. आघाडीच्या जागावाटपात जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्या. निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे. कोल्हापुरातून आमदार राजू आवळे, आमदार जयश्री जाधव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, शहराध्यक्ष सचिन जाधव, माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर, ‘गोकुळ’चे संचालक प्रा. किसन चौगले, पंडितराव केणे, विश्वनाथ कुंभार, बाळासाहेब खाडे, शंकरराव पाटील आदी उपस्थित होते.
‘के. पी.’ समर्थकही बैठकीला उपस्थित
माजी आमदार के. पी. पाटील यांचे समर्थक पुण्यातील काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीला उपस्थित होते. यावरून, ‘राधानगरी’ मतदारसंघावर काँग्रेस ताकदीने दावा करण्याची शक्यता आहे.
‘कागल’, ‘शाहूवाडी’ सोडून सगळीकडे तयारी
काँग्रेसने गेल्या पाच वर्षांत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा ‘कागल’ व आमदार विनय कोरे यांचा ‘शाहूवाडी’ वगळता आठ मतदारसंघांत बांधणी केलेली आहे. त्यामुळेच आता मागणी करतानाही हे दोन मतदारसंघ सोडूनच ते मागणी करत आहेत.