पेठवडगाव : कोरोनाबाधित रुग्णांवर लोकसहभागातून मोफत उपचार करण्याचा वडगावातील दहा युवकांना आदर्श इतरांनी घेतला पाहिजे. आपल्या गावासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने यांनी केले.
येथील शेतकरी मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आरोग्य मंदिराने महिन्याभर सेवा दिली होती. त्यानंतर जागेअभावी बंद ठेवण्यात आले. नागरिकांनी दातृत्व तर त्या दहा युवकांचे प्रत्यक्ष काम या सदिच्छाच्या जोरावर या आरोग्य मंदिरातून ९७ रुग्ण उपचारानंतर घरी परतले होते. या समारोपप्रसंगी माने बोलत होते. दरम्यान भूषण विभुते, सचिन सागर, महेश भोपळे, विजय माने, विजयसिंह शिंदे, पवन पोवार, नितीन कुचेकर, राज कोळी, पियूश सावर्डेकर, संजय कोठावळे यांनी कोविड केअर सेंटर सुरू ठेवण्यासाठी पुढाकार घेतला होता.
नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सचिन सलगर यांनी केले. आभार भूषण विभूते यांनी मानले. या वेळी डॉ. आर. ए. पाटील, डाॅ. अजिंक्य हाके यांच्यासह कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.