कोल्हापूर : इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू यांनी जलस्रोतांची काळजी घेतली. त्यांचा आदर्श आजच्या पिढीने घेऊन पंचगंगा प्रदूषण न करण्याची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी केले.अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने रविवारी सायंकाळी येथील शाहू स्मारक भवनमध्ये ‘मराठा वार्षिक दिनदर्शिका’चा प्रकाशन सोहळा झाला. त्याप्रसंगी डॉ. मुळीक हे ‘पंचगंगा प्रदूषण व आरोग्य समस्या’ या विषयावर मार्गदर्शन करीत होते. महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष वसंतराव मुळीक हे प्रमुख उपस्थित होते. प्रथम दिनदर्शिका शहीद जवानांना अर्पण करण्यात आली.यावेळी वसंतराव मुळीक म्हणाले, आरक्षण हा मराठा समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे; पण आरक्षण मिळाले म्हणजे प्रश्न मिटणार नाहीत. मराठा समाजात सध्याच्या स्थितीत एकजूट राहणे आवश्यक आहे. मराठा समाजासाठी भवन, शैक्षणिक संकुल उभारण्याची संकल्पना आहे. हे भवन म्हणजे स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केंद्र असेल.यावेळी शशिकांत पाटील यांनी स्वागत केले. दीपक पाटील यांनी प्रास्ताविक केले. समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. उद्योगपती चंद्रकांत जाधव, कर्नल दिलीपसिंह थोरात, महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, उद्योगपती राजेंद्र पाटील, रोटरी क्लबचे प्रेसिडेंट आर. वाय. पाटील, कमल सावंत, आदी मान्यवर उपस्थित होते.पंचगंगा प्रदूषणमुक्त करूयासध्या अनेकजण कर्मकांडाच्या मागे लागून मने प्रदूषित करीत आहेत. देशभरात कर्मकांडाच्या कृत्यांमुळे नद्यांचे पाणीही प्रदूषित होत आहे. इतिहासात शिवरायांनी गडकिल्ल्यावरील पाण्याचा वापर किल्ल्यासाठीच केला. त्याचप्रमाणे राजर्षी छत्रपती शाहूंनी राधानगरी धरण बांधताना त्यावरची जागा ही वनखात्यासाठी आरक्षित ठेवली; त्यामुळेच जिल्ह्याला स्वच्छ पाणी मिळाले. या राजांनी जलस्रोतांची काळजी घेतली. हाच आदर्श घेऊन पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करूया, असे आवाहन डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी केले.
जलस्रोतांबाबत शिवराय, शाहूंचा आदर्श घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:06 AM