कोल्हापूर : मुंबई, पुण्यानंतर सांस्कृतिक शहर असलेल्या कोल्हापुरात गणेशोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या उत्सवाला विधायकतेचे वळण देत डॉल्बीमुक्त उत्सवासाठी सर्व मंडळांनी व नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी केले. शाहू स्मारक भवनमध्ये जायंट्स ग्रुप आॅफ कोल्हापूर प्राईड व कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे आयोजित ‘मोरया अवॉर्ड २०१४’ या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर वैशाली डकरे, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष विकास कांबळे, जायंट्सचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र ओबेरॉय, केंद्रीय समिती सदस्य प्रमोद शहा, जायंट्सचे अध्यक्ष शरदचंद्र रेवणकर, जायंट्स फेडरेशनच्या उपाध्यक्षा मंगला कुलकर्णी उपस्थित होत्या. डॉ. शर्मा म्हणाले, गणपती हा आनंदाचा उत्सव आहे. तो साजरा करण्यासाठी डॉल्बीविरोधी मानसिकता निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यायला हवा. डॉल्बीमुळे यापूर्वी भिंत कोसळणे, अशा दुर्घटनेसह नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे डॉल्बीला विरोध केला पाहिजे. त्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. महापौर वैशाली डकरे यांनी, विधायक गणेशोत्सवासाठी कोल्हापूरकरांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे; पण त्याची व्याप्ती वाढवत राज्यातील आदर्श गणेशोत्सव साजरा करणारे शहर म्हणून पुढे यावे, असे आवाहन केले. यावेळी रवींद्र ओबेरॉय, प्रमोद शहा यांनी मनोगत व्यक्त केले. अनिल चौगुले यांनी इको फ्रेंडली गणेशोत्सवाची माहिती सांगितली. स्पर्धेला दिग्दर्शक यशवंत भालकर, प्रकाश क्षीरसागर, पत्रकार सुधाकर काशीद यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. विकास कांबळे व शरदचंद्र रेवणकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. इंदुमती गणेश यांनी सूत्रसंचालन केले. दीपक शिरोडकर यांनी आभार मानले. पारितोषिक विजेते --स्पर्धेचे पारितोषिक असे (अनुक्रमे, प्रथम, द्वितीय, तृतीय)घरगुती आरास : केतकी पेडणेकर, इंद्रजित जगताप, सचिन गायकवाडसार्वजनिक गणेशोत्सव (तांत्रिक देखावे) : शाहूपुरी युवक मंडळ, सोल्जर्स ग्रुप, जुना बुधवार, शिपुगडे तालीम संस्था, नंदी तरुण मंडळ.सजीव देखावे : छत्रपती शिवाजीराजे तरुण मंडळ कसबा बावडा, युवक मित्रमंडळ राजारामपुरी, कै. उमेश कांदेकर युवा मंच रंकाळा टॉवर.शिस्तबद्ध मिरवणूक : श्री तरुण मंडळ कोष्टी गल्ली.
डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी पुढाकार घ्या
By admin | Published: September 08, 2015 12:29 AM