कोल्हापूर : शेतीमालाच्या विक्रीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्या ही काळाची गरज असून करवीर तालुक्यातील शेतकऱ्यांसह माजी सैनिकांनी या कंपन्या स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे मत जिल्हा सैनिक अधिकारी प्रदीप ढोले-पाटील यांनी व्यक्त केले. शेतीमाल उत्पादक गट स्थापन करण्याबाबत आजी-माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने आयोजित बैठकीत ढोले-पाटील बोलत होते. यावेळी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत हांडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पवार, उपाध्यक्ष अशोक माळी उपस्थित होते. यावेळी कोल्हापुरातील सीएसडी कॅन्टीनबाबतच्या समस्या सोडवून माजी सैनिकांचा त्रास कमी करु, असे आश्वासन लक्ष्मीकांत हांडे यांनी दिले. याच कार्यक्रमात आमशी येथील राष्ट्रीय कुस्ती खेळाडू विश्रांती भगवान पाटील हिला आजी-माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने मदतीचा धनादेश तिचे वडील भगवान पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी सुभेदार तुकाराम जाधव, प्रकाश पाटील, शांतीनाथ बोटे, विजय डेळेकर, संजय मेटील उपस्थित होते.
शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी पुढाकार घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 4:17 AM