कोल्हापूर : शहरातील पूरपरिस्थितीच्या काळात आपण सर्वांनी जसे शहर स्वच्छतेच्या बाबतीत प्रयत्न केले तसेच यापुढील काळात प्लास्टिकमुक्त कोल्हापूर शहर करण्यासाठी पुढाकार घ्यावा. प्लास्टिकचा वापर स्वत: करू नका; तसेच इतरांनाही करू देऊ नका, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त महावीर महाविद्यालय यांच्या वतीने प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. महाविद्यालयातील बास्केटबॉल मैदान येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले की, विद्यार्थी, विद्यार्थिनींसह प्लास्टिकमुक्त कोल्हापूर होण्यासाठी शासनाला कशी मदत करता येईल, यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे.
जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली त्यावेळी आपण सर्वांनी स्वच्छतेमध्ये सहभाग घेतला. त्याच पद्धतीने पुढील काळात आपल्याला कोल्हापूर शहर प्रदूषणमुक्त करावयाचे आहे. त्यात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे. आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी महिन्यातून एकदा स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे.आयुक्त कलशेट्टी यांनी विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी यांना स्वच्छतेची शपथ दिली. डॉ. गोपाळ गावडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले; तर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य डॉ. आर. पी. लोखंडे यांनी केले.सिद्धार्थनगर येथे ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम महावीर महाविद्यालयामार्फत करण्यात येत आहे. सिद्धार्थनगर हा परिसर संपूर्ण कोल्हापूर शहरामध्ये आदर्श ठरेल, असे प्रयत्न करण्यात येत असल्याचे लोखंडे यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अस्मिता चौगुले यांनी केले व प्रा. रविदास पाडवी यांनी आभार केले. यावेळी नीलेश पोतदार, पर्यावरण अधिकारी अपेक्षा सूर्यवंशी, प्रा. अंकुश बनसोडे, अंकुश गोंडगे, जावेद मिस्त्री, विद्यार्थी, विद्यार्थिनी व कर्मचारी उपस्थित होते.