बेळगाव :महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष्यांनी सीमाप्रश्न सोडवणूक आपल्या जाहीरनाम्यात अग्रक्रमावर घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने सर्व राजकीय पक्षांना आणि महाराष्ट्रातील नेत्यांना पत्र लिहून केले आहे. यासंदर्भात समितीने महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांचे अध्यक्ष, नेते, मंत्री, आणि सीमाप्रश्नी आत्मीयता असलेल्या मंडळींना पत्राद्वारे आवाहन केले आहे.भाषावार प्रांतरचनेनुसार सर्व भाषिकांना त्यांच्या त्यांच्या भाषेची राज्य मिळाले, पण महाराष्ट्रावर सुरुवातीपासूनच अन्याय झाला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बेळगाव येथून संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली. पण १९५६ पासून बेळगाव, कारवार, निपाणी, खानापूर, बिदर, भालकी सह ८६५ गावांचा प्रदेश अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला आहे. त्यासाठी कित्येकजण हुतात्मे झाले, अनेक आंदोलने झाली, अनेकांनी तुरुंगवास भोगला पण सीमाप्रश्न जशास तसाच आहे. म्हणून २00४ साली महाराष्ट्र शासनाने हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे.हा खटला वेगाने चालावा आणि १९५६ पासून प्रलंबित असलेला सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात यावा यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी स्वत: पुढाकार घेउन सर्वतोपरी प्रयत्न करावेत आणि सीमाप्रश्न सोडवणूक हा विषय आपल्या जाहीरनाम्यात अग्रक्रमावर घ्यावा असे आवाहन समितीने आपल्या पत्रात केले आहे.
समितीने यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मनसे प्रमुख राज ठाकरे, शेकापचे जेष्ठ नेते एन. डी. पाटील, शेकापचे नेते जयंत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे नेते संजय राऊत, नीलम गोऱ्हे, एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, धैर्यशील माने, आमदार बच्चू कडू, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नारायण राणे, रिपाईचे रामदास आठवले, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, नितेश राणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, भाई जगताप, संध्याताई कुपेकर, सुप्रिया सुळे, अजित पवार, अमोल कोल्हे, अशोक चव्हाण,आदी नेत्यांना पत्रे पाठविण्यात आली आहेत.