राजीव मुळ्ये, विजय पवार/ सातारा/ नागठाणे नागठाण्याजवळ शस्त्रास्त्रांचा धाक दाखवून कुरिअर कर्मचाऱ्याकडून ३३ लाख ६० हजारांची लूट करणाऱ्या दरोडेखोरांनी त्यांच्या वाहनात बसताना आणि ते वाहन सेवारस्त्यावरून हमरस्त्याला लागताना अशा दोन वेळा गोळीबार केला. घटनास्थळावरून सुरक्षितपणे निसटता यावे, हाच हेतू यामागे दिसून येत असून, त्यासाठीच त्यांनी दहशत निर्माण केली. दरम्यान, लुटालूट करताना जी झटापट झाली तेव्हा ‘ले ले, ले ले, जल्दी ले ले,’ अशा सूचना दरोडेखोर एकमेकांना हिंंदीतून देत होते, अशी प्राथमिक माहिती आहे. बोरगावपासून आठ किलोमीटर दक्षिणेकडे निसराळे फाट्याजवळ सिमरनजित आणि नवमी असे दोन ढाबे शेजारी-शेजारी आहेत. त्यापैकी सिमरनजित ढाब्यासमोर बोरिवलीकडे जाणारी एसटी बस मंगळवारी रात्री जेवणासाठी थांबली. दोन्ही ढाबे सेवारस्त्यालगत आहेत. कोल्हापूरकडून सेवारस्त्याला लागून एसटी बस ढाब्याच्या इमारतीच्या एका टोकाला उभी राहिली. एसटीचे तोंड साताऱ्याच्या दिशेने होते. सशस्त्र दरोडेखोर एसटीचा माग काढत निसराळे फाट्यावरून वळण घेत सेवारस्त्याला लागले असावेत, असा अंदाज असून, त्यांची इनोव्हा गाडी एसटीच्या बरोबर समोर त्यांनी उभी केली होती. नियोजन करून त्यांनी हा गुन्हा केल्याचे पोलिसांचे मत आहे. तिरुपती कुरिअरचे कर्मचारी गोपीनाथ तानाजी कदम सातारा तालुक्यातील मालगावचे रहिवासी आहेत. पाच महिन्यांपासून ते तिरुपती कुरिअरमध्ये सेवेत आहेत. तत्पूर्वी ते न्यू इंडिया कुरिअरमध्ये कार्यरत होते. बसमध्ये १३-१४ क्रमांकाच्या आसनावर बसलेल्या कदम यांच्यावर मागून आणि पुढून एकदम हल्ला झाला. पुढील व्यक्तींनी त्यांना पिस्तूल दाखविले, तर मागील बाजूने त्यांच्या नकळत त्यांच्या डोळ्यांत तिखट टाकले गेले. बॅग घट्ट धरून ठेवल्यामुळे त्यांच्या हातावर वार करून ती बॅग ताब्यात घेण्यात आली. हे सर्व सुरू असताना एक दरोडेखोर ‘ले ले, ले ले, जल्दी ले ले,’ असे म्हणाल्याची प्राथमिक माहिती आहे. ढाब्यावर बऱ्यापैकी वर्दळ होती. परंतु बसमध्ये घडलेले थरारनाट्य अनेकांना उशिराच समजले. लूट करून जेव्हा दरोडेखोर त्यांच्या इनोव्हा गाडीजवळ आले, तेव्हा त्यांनी एक गोळी झाडली आणि ढाब्यावरील सर्वजण दचकले. गाडीत बसताना कुणी प्रतिकार करू नये, यासाठीच त्यांनी गोळी झाडून दहशत निर्माण केली असावी, असे पोलिसांचे मत आहे. या गोळीची पुंगळी पोलिसांना सापडली आहे. दरम्यान, सेवारस्त्यावरून कोल्हापूरच्या दिशेला जाताना त्यांनी आणखी एक गोळी झाडली; मात्र तिची पुंगळी सापडू शकलेली नाही. त्या ठिकाणापासून लगेच त्यांची गाडी महामार्गाला लागली. सुरक्षित पलायनासाठी दहशत निर्माण करण्याचा त्यांचा हेतू होता, हे स्पष्ट झाले आहे. सगळं इथंच ठेवून जावं लागलं असतं... ‘‘जमीन-जुमला, शेतीवाडी, घरदार सगळं आपण कमावतो; पण जाताना ते सगळं इथंच ठेवून जावं लागतं. दरोडेखोरांनी झाडलेली गोळी लागली असती तर...? कमावलेलं सगळं इथंच ठेवून जावं लागलं असतं की...’’ हे उद्गार आहेत दरोडेखोरांच्या गोळीचा आवाज जवळून ऐकून भेदरलेल्या एका स्थानिक ग्रामस्थाचे. नवमी ढाब्यासमोर चार-पाच जण घटनेच्या वेळी उभे होते. शेजारच्याच सिमरनजित ढाब्यावर काहीतरी घडते आहे, याची त्यांना कुणकूण लागली होती. पण नेमकं काय, ते समजत नव्हतं. घटनेचं गांभीर्यही नीट जाणवत नव्हतं; पण जेव्हा इनोव्हा सुसाट वेगानं कोल्हापूरच्या दिशेनं निघाली, तेव्हा दरोडेखोरांनी ही घटना औत्सुक्यानं पाहणाऱ्या या लोकांना पाहिलं. त्यांना भीती वाटावी म्हणून एक गोळी झाडली आणि हे सगळेच जण नखशिखांत हादरले. ‘पार्सल’ची सुरक्षा ऐरणीवर कुरिअरमार्फत पाठविण्यात येणारी मौल्यवान ‘पार्सल’ अशा प्रकारे सार्वजनिक वाहतुकीच्या बसमधून नेणे कितपत सुरक्षित आहे, हा मुद्दा या दरोड्याच्या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे. पूर्वी याच भागात अशीच गोळीबार करून लुटालूट झाली होती. त्यावेळी खासगी आरामबसमधून तब्बल एक कोटीची रक्कम लांबविण्यात आली होती. सामान्यत: आरामबसमधून मौल्यवान दागिने, वस्तू आणि मोठ्या रकमांची ने-आण केली जाते. अशा मौल्यवान ‘पार्सल’साठी काही बसेसमध्ये खास सोय केली जाते. बसमधील कार्पेटच्या खाली चोरकप्पे केले जातात. परंतु तरीही अशा घटना घडतच असल्याने अशी ने-आण सुरक्षित राहिली नसल्याचेच समोर येते.
ले ले, ले ले, जल्दी ले ले!
By admin | Published: September 17, 2015 12:38 AM