कोल्हापूर : पंचगंगा नदी स्वच्छ अन् प्रवाहित ठेवण्यासाठी जे उपाय करावे लागतील ते करा. या नदीला मिळणाऱ्या उपनद्या, ओढे, ओहोळ व शेतातील पाणी शुद्ध स्वरूपात येण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी सोमवारी येथे केली. जिल्ह्णाच्या प्रादेशिक विकास आराखड्यासंदर्भातील अहवाल २९ सप्टेंबरला शासनाला पाठविला जाणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात प्रादेशिक विकास आराखड्यासंदर्भात शिफारशी मागविण्यासाठी संबंधित अभ्यास गटांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, नगररचना विभागाचे सहसंचालक एम. आर. खान आदींची होती.एन. डी. पाटील यांनी पंचगंगा नदी व उद्योगधंद्यांसाठी लागणाऱ्या जमिनींबाबत सूचना मांडल्या. पंचगंगा नदी स्वच्छ राहण्यासाठी नियोजन केले पाहिजे. यासाठी नदीशेजारील गावांचीही महत्त्वाची भूमिका आहे. उद्योगधंद्यांसाठी उद्योगपतींना चांगल्या जमिनीच का लागतात? लाखो एकर जमीन पडिक असून त्याचा विचार ते का करत नाहीत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला तसेच उद्योगपतींना जमिनी या मालकी हक्कानेच का हव्या आहेत? त्या जमिनींचे दर गगनाला भिडतात म्हणून त्यावर सट्टा लावण्यासाठी पाहिजे आहेत का? अशी चर्चा होत आहे. त्यासाठी निवृत्त न्यायाधिशांचा एक आयोग नेमावा. त्यासमोर उद्योगपतींनी जमिनींचे नियोजन काय करणार, याचे विवेचन करावे. व्यापारी, वाणिज्य व उद्योग अभ्यास गटाचे जे. एफ. पाटील यांनी आराखड्याचे नियोजन हे लोकांच्या गरजांमधून तयार झाले पाहिजे असे सांगितले. आराखड्यामध्ये क्रीडांगण, पार्किंग या गरजा लक्षात घेणे गरजेचे आहे. पेठवडगाव-पारगावदरम्यान इंडस्ट्रीयल प्रोसेस, शाहूवाडी-बांबवडे दरम्यान इंडस्ट्रियल प्रोसेस, राधानगरी-गारगोटी परिसरात व्यापारी केंद्रे, मुरगूड-कागल दरम्यान पडिक जमिनीवर प्रकल्प, हुपरी येथे दाग-दागिने उत्पादन संशोधन केंद्र, कापशी येथे कातडी प्रक्रिया केंद्र, हमीदवाडा येथे साखर प्रक्रिया केंद, राधानगरी व आंबोली येथे वन उत्पादन केंद्र, शिरोली येथे वाहतूक प्रक्रिया केंद्र, हातकणंगले येथे मुद्रण व संशोधन केंद्र, अशा सूचना मांडून इंडस्ट्रियल लोकेशनबद्दल माहिती दिली.वस्त्रोद्योग उद्योजक गोरखनाथ सावंत यांनी आराखडा तयार करताना वस्त्रोद्योगाला स्वतंत्र स्थान दिल्याबद्दल अभ्यास गटांचे आभार मानले. शिरोळ व हातकणंगले हे तालुके ‘टेक्सटाईल हब’ म्हणून सरकारने घोषित करावेत, अशी सूचना मांडली. इचलकरंजीच्या आसपासच्या परिसरात वीस टेक्सटाईल झोन जाहीर करावेत. त्याचबरोबर या ठिकाणी ५०० मेगावॅटचे सबस्टेशन करावे, त्याकरीता २५ हेक्टर जमीन राखीव ठेवावी. ‘टेक्सटाईल झोन’ म्हणून ज्या जमिनी आरक्षित केल्या जातील. त्यातील टाऊनशीपसाठी व कामगारांच्या घरांसाठी काही जागा राखीव ठेवाव्यात. इचलकरंजी शहरातील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर एखाद्या डोंगराळ भागातील ६० ते ८० हेक्टर जमीन घेऊन त्यासाठी प्रोसेसर्स युनिट उभे करावे. बाहेर पडणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेतीसाठी वापरण्याचे नियोजन करावे, अशा सूचना सावंत यांनी मांडल्या.शहराला बाह्यवळण रस्त्याची गरजवाहतूक परिवहन व दळणवळण अभ्यास गटाचे विनायक रेवणकर यांनी इंडस्ट्रीजच्या विकासासाठी प्रथम रस्ते विकास महत्त्वाचा असल्याची सूचना मांडली. शहराला नवीन बाह्णवळण रस्ता करण्याची आवश्यकता आहे. शहरातील रहदारीचा ताण कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रं.४ वरील कागल चेकपोस्टजवळ प्रमुख वाहतूक केंद्र (ट्रान्स्पोर्ट हब) करावा तसेच कागल चेकपोस्ट ते वारणा पुलापर्यंत चौपदरी रस्त्यालगत १० मीटर रुंदीचा सर्व्हिस रस्ता करावा. कारण या रस्त्यावर छोट्या वाहनांची वर्दळ असल्याने वाहतुकीवर ताण पडतो.
पंचगंगा स्वच्छ राहण्यासाठी उपाय करा
By admin | Published: September 08, 2015 12:48 AM