कोल्हापूर : माझ्याबद्दल राष्टवादीच्या कार्यकर्त्यांत गैरसमज असल्याचे जाणवते. माझ्याकडून अनवधानाने काही गोष्टी झाल्याही असतील; पण मी त्या जाणीवपूर्वक करीत नाही आणि तो माझा स्वभावही नाही. तरीही काही चुका झाल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. चुका पदरात घ्या आणि साथ द्या असे भावनिक आवाहन करीत ‘येथून पुढे तुम्ही सांगाल त्याप्रमाणेच वाटचाल करू,’ अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारी दिली.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाडिक यांच्या ताराराणी चौकातील कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार हसन मुश्रीफ होते.
महाडिक म्हणाले, शरद पवार यांनी दिलेल्या संधीचे सोने करीत प्रलंबित प्रश्न मार्गी लावले. भाजप सरकारविरोधात जनतेत संताप आहे. कोल्हापूर शहरातील वातावरण जिल्ह्यात पसरते; पक्षात गैरसमज आहेत. शहरातील मंडळींशी चर्चेने मार्ग काढूया. चुका पदरात घेऊन पुढील वाटचाल करूया. हसन मुश्रीफ म्हणाले, येत्या दोन-तीन दिवसांत आघाडीचे चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत आपल्या स्तरावरून प्रचार यंत्रणा गतिमान करायची आहे. भाजप सरकारच्या काळात संविधान धोक्यात आले असून, ते वाचविण्यासाठी मतभेद विसरून एकसंधपणे सामोरे गेले पाहिजे. शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी कामाला लागा. त्यांच्या हातून काही चुका झाल्या असतील त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करूया.
संध्यादेवी कुपेकर म्हणाल्या, चंदगड राष्टÑवादीचा बालेकिल्ला असून, येथून मताधिक्य देण्यास कटिबद्ध आहे. शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्ष अनिल साळोखे, के. पी. पाटील, बी. एन. पाटील-मुगळीकर, मधुकर जांभळे, आदिल फरास यांनी मनोगत व्यक्त केले. बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भैया माने, युवराज पाटील, संगीता खाडे, जहिदा मुजावर, उपस्थित होते.‘अक्षता’ आणि ‘पाटील’नाराजी आता संपल्यामुळे आम्ही प्रचारात आघाडीवर राहूच; पण कॉँग्रेसच्या नेत्यांच्या दारात जाऊन त्यांनाही सोबत घेऊ. आमच्या मुलग्याचे लग्न आहे, शेजारच्या गावातील पाटील अक्षताला येणार असतील तर नको कसे म्हणायचे? अशी मिश्कील टिप्पणी के. पी. पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता केली. यावर, ‘पुढेही (विधानसभेला) तसेच आहे का?’ असा टोला मुश्रीफ यांनी हाणला.महापौर मोरे, राजेश लाटकर यांची पाठया बैठकीला राष्टवादीचे बहुतांश नगरसेवक उपस्थित होते; पण राष्टÑवादीच्या महापौर सरिता मोरे, राजेश लाटकर यांनी पाठ फिरविली. त्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथील ताराराणी चौकातील धनंजय महाडिक यांच्या कार्यालयात राष्टÑवादीच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी बैठक झाली. यावेळी सर्व नेत्यांनी हात वर करून विजयाचा निर्धार केला. अनिल साळोखे, युवराज पाटील, आर. के. पोवार, ए. वाय. पाटील, संध्यादेवी कुपेकर, धनंजय महाडिक, हसन मुश्रीफ, के. पी. पाटील, बी. एन. पाटील, बाबासाहेब पाटील, संगीता खाडे, जहिदा मुजावर, भैया माने उपस्थित होते.