कोल्हापूर : पोलीस मुख्यालयाच्या मागील परिसरात मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत सोडणाºया बिल्डरांना नोटीस बजावण्याचे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी उपशहर रचनाकार नारायण भोसले यांना दिले.
प्रभाग क्रमांक १३, रमणमळा येथील चार ते पाच बिल्डरांकडून मैलमिश्रित सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीत सोडण्यासाठी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. १०० पेक्षा जास्त नळ टाकले जात असून, काम अंतिम टप्प्यात आले आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्यावरून सामाजिक कार्यकर्ते सुरेश पोवार यांनी आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याची गंभीर दखल घेऊन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. याचबरोबर प्रदूषण नियंत्रण मंडळानेही या संदर्भात खुलासा मागितला आहे.