सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल ठरवल्याने मराठा समाजात असंतोष पसरला आहे. समाजातील असंतोष थांबविणे कठीण झाले आहे. त्यामुळे आरक्षणप्रश्नी तातडीने सकारात्मक निर्णय घ्या, अशी मागणी गडहिंग्लज येथील सकल मराठा समाजातर्फे निवेदनातून तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे, मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण देण्याबरोबर समाजातील तरुणांच्या उन्नतीसाठी सारथी व आण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला २ हजार कोटी व महामंडळास ५ हजार कोटींचा प्रतिवर्षी भरीव निधी द्यावा. विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात ओबीसीप्रमाणे सवलत तसेच नोकरीतही ओबीसीप्रमाणे सवलती मिळाव्यात यासाठी राज्य शासनाच्या अखत्यारित येणाऱ्या मागण्यांची पूर्तता राज्य शासनाने तत्काळ पूर्ण कराव्यात.
निवेदनावर, आप्पा शिवणे, किरण कदम, वसंतराव यमगेकर, युवराज बरगे, सागर मांजरे, नागेश चौगुले, विश्वास खोत, किरण डोमणे, संजय पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.