मुरगूड : गोकुळ दूध संघाच्या स्वीकृत संचालकपदी मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांना संधी द्यावी, अशी मागणी मुरगूड शहर आणि परिसरातील कार्यकर्त्यांनी केली आहे. येथील विश्वनाथराव पाटील मुरगूड बँकेच्या सभागृहात आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी यमगेचे माजी सरपंच शिवाजीराव पाटील होते.
गेल्या अनेक वर्षांपासून नामदार मुश्रीफ यांच्याबरोबर प्रवीणसिंह पाटील राजकारणामध्ये सक्रिय आहेत. मुरगूड परिसरातील राष्ट्रवादी भक्कम करण्यासाठी त्यांनी चांगले प्रयत्न केले आहेत. गोकुळसाठी त्यांनी व त्यांच्या पत्नी दोघांनीही विरोधी आघाडीकडून अर्ज दाखल केले होते; पण मंत्री मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या सांगण्यानुसार त्यांनी माघार घेतली. त्यानंतर ही त्यांनी विरोधी शाहू आघाडीच्या प्रचार मोहिमेत पुढाकार घेतला होता.
यावेळी मुरगूड बँकेचे उपाध्यक्ष वसंतराव शिंदे म्हणाले, कागलच्या पश्चिम भागात प्रवीणसिंह पाटील यांनी प्रामाणिकपणे मुश्रीफ यांच्यासाठी काम केले आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून गोकुळमध्ये उमेदवारीचा हट्ट ते करत होते. शिवाय आमचे नेते मुश्रीफ यांनी ग्रीन सिग्नल दिल्याने संपूर्ण जिल्ह्याचा दौरा पूर्ण केला होता. पण मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या आदेशानुसार ऐनवेळी उमेदवारी अर्ज माघार घ्यावा लागला. मुरगूडच्या पाटील घराण्याला गोकुळचा वारसा आहे. तो सतत पुढे ठेवण्यासाठी प्रवीण पाटील यांना संचालक मंडळात सामावून घ्यावे, अशी विनंती त्यांनी केली.
यावेळी राहुल वंडकर, शिवाजी सातवेकर, अशोक पाटील, अर्जुन मसवेकर, नामदेव भांदीगरे, रणजित मगदूम, रणजित सासणे, प्रल्हाद कांबळे, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य राजू आमते, संजय मोरबाळे, सुधीर मोहिते, पांडुरंग चांदेकर, जगन्नाथ पुजारी, रणजित मगदूम, अमर देवळे, एकनाथ पाटील, रमेश पाटील, दिग्विजय चव्हाण आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रवीणसिंह पाटील यांचा फोटो वापरावा