कोल्हापूर : विविध प्रश्नांची वास्तविक उत्तरे आणि शिवाजी विद्यापीठाची होत असलेली बदनामी थांबविण्याबाबतची भूमिका सोमवार (दि. २९) पर्यंत विद्यापीठ प्रशासनाकडून जनतेसमोर मांडण्यात यावी; अन्यथा कुलगुरू निवासातील कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी यांनी गुरुवारी येथे दिला.विद्यापीठातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी या संघटनेने कुलगुरूंना गुरुवारी कार्यालयात जाण्यापासून रोखण्याचे आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यावर विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत या संघटनेच्या शिष्टमंडळासमवेत प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी चर्चा केली.
त्यामध्ये शुभम शिरहट्टी, सौरभ मोरे, उत्तम पोवार, अमन शेख यांनी संघटनेने उपस्थित केलेले मुद्दे मांडले. त्यावर प्रशासनाने कशी चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिली, तेही स्पष्ट केले. त्यावर प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
‘विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष’ स्थापन करण्याची प्रक्रिया सुुरू आहे. अन्य मुद्द्यांबाबत माहिती, उत्तरे दिली जातील, असे सांगितले. यानंतर सोमवारपर्यंत विद्यापीठ प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देऊन संघटनेने चर्चेला पूर्णविराम दिला. यावेळी संघटनेचे बाळनाथ शेळके, अमोल राठोड, सोमनाथ सोनुले, मदनसिंह साठे, मुस्तकीम अत्तार, पार्थ तिवारी, रोहित वळिवडे, रोहित कापसे, नीरज वाघवे, व्यंकटेश येलीकर, आदींचा समावेश होता.
प्रवेशद्वारावर रोखल्याने तणावसंघटनेच्या वतीने गुरुवारी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यावर विद्यापीठाच्या सुरक्षारक्षकांनी या संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारात रोखल्याने वादावादी झाली. त्यामुळे या परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांनी शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलाविल्यानंतर तणाव निवाळला.
स्मरणपत्रावर बेजबाबदारपणे उत्तरेसंघटनेने विद्यापीठ प्रशासनाला दि. १२ एप्रिलला दिलेले निवेदन, दि. १८ एप्रिलच्या स्मरणपत्रावर प्रशासनाने बेजबाबदारपणे उत्तरे दिली आहेत. त्यामध्ये पदवी प्रमाणपत्र, कुलगुरू निवासातील कार्यालयावरील खर्च, तक्रार निवारण कक्ष, प्रभारी प्राचार्य, शैक्षणिक सल्लागार नेमणूक या मुद्द्यांचा समावेश असल्याचे शिरहट्टी यांनी सांगितले.
या संघटनेने पूर्वी मागणी केल्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने योग्य माहिती दिली आहे. मात्र, संघटनेच्या काही शंका आहेत. त्याबाबत चर्चा केली आहे. त्यांनी पुन्हा मागणी केल्यानुसार माहिती दिली जाईल.- डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू