लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : देशाच्या ४० कोटी लोकांचा उदरनिर्वाह चालत असलेल्या किरकोळ व्यवसायावर एकाधिकारशाही निर्माण करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांविरुद्ध कडक कारवाई करावी. भारतातील ई-कॉमर्स व्यवसायाचे नियमन व देखरेख करण्यासाठी सशक्त नियामक प्राधिकरणाची स्पष्ट तरतूद असलेले ई-कॉमर्स धोरण त्वरित जाहीर करावे, ‘लोकल ऑन व्होकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला गती मिळावी, अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सने केली आहे. याबाबतचे निवेदन मंगळवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले. ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, नवी दिल्ली’ (कॅट) या देशातील व्यापारी संघटनेच्या वतीने मंगळवारी ‘रिटेल डेमोक्रॉसी डे’ साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने वरील निवेदन दिले. ई-कॉमर्स कंपन्यांविरुद्ध अनेक तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. सरकारने सुरू केलेल्या ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या चांगल्या मोहिमेचा प्रतिकूल परिणाम भारतीय व्यापाऱ्यांच्या व्यापारी स्थितीवरही होत आहे. तरी राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर आणि प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्हा पातळीवर व्यापारी, ग्राहक, नागरिक, समाज आणि लघुउत्पादकांचे प्रतिनिधी असलेली सरकारी अधिकाऱ्यांची एक संयुक्त समिती स्थापन करावी. जेणेकरून मोहीम तळागाळापर्यंत नेऊन अधिकाधिक लोकांना यात सामील होण्यासाठी प्रोत्साहित करता येईल.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, ‘कॅट’चे उपाध्यक्ष धैर्यशील पाटील, संघटन सचिव ललित गांधी, धनंजय दुग्गे, जयेश ओसवाल, प्रदीपभाई कापडिया, संचालक राहुल नष्टे, प्रशांत शिंदे व संभाजीराव पोवार, विजय नारायणपुरे उपस्थित होते.
---
फोटो नं १५१२२०२०-कोल-चेंबर ऑफ कॉमर्स निवेदन
ओळ : कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना ई-कॉमर्स कंपन्यांविरुद्ध कडक कारवाई करावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी ललित गांधी, संजय शेटे, प्रदीप कापडिया, जयेश ओसवाल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
---
इंदुमती गणेश