कोल्हापूर : दिल्लीत आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांचा मोदी सरकारकडून छळ मांडण्यात आला आहे. जमीन वाचविण्यासाठीच्या संघर्षात शंभराहून अधिक शेतकऱ्यांची आहुती गेली. चर्चेच्या फेऱ्या झाल्या तरी यातून मार्ग निघेना झाला आहे. ७० दिवसांहून अधिक काळ कडाक्याच्या थंडीत प्रशासनाची अवकृपा झेलत बसलेल्या या अन्नदाता शेतकऱ्यांसाठी किमान एक दिवस रस्त्यावर उतरा आणि हुकूमशाही सरकारला वठणीवर आणा, असे कळकळीचे आवाहन किसान संघर्ष समन्वय समितीने केले आहे.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या अन्यायी भूमिकेचा निषेध म्हणून आज, शनिवारी देशभर चक्का जाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. आंदोलनात नेहमीच आघाडीवर राहिलेल्या कोल्हापुरातही दाभोळकर कॉर्नर चौकात दोन तास चक्का जाम आंदोलन करून शहरवासीयांचे शेतकऱ्यांच्या वेदनांकडे लक्ष वेधले जाणार आहे. समन्वय समिती व घटक संघटनांची किसान सभेचे नामदेव गावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात आली. सकाळी ११ वाजता दाभोळक़र काॅर्नर चौकात एकत्र जमून दुपारी एकपर्यंत वाहने अडवून धरली जाणार आहेत. हा रस्ता शहरातील प्रमुख रहदारीचा मार्ग आहे. पाच मिनिटे जरी वाहतूक थांबली तर वाहनांच्या दोन किलोमीटर लांब रांगा लागतात. शेतकऱ्यांच्या व्यथांची शहरवासीयांना जाणीव व्हावी म्हणूनच हा मार्ग निवडला असल्याचे नामदेव गावडे यांनी सांगितले. शहरात एकाच ठिकाणी आंदोलन होणार असल्याने समन्वय समितीशी संलग्न संघटना पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोबतच्या नागरिकांना येथेच एकत्र आणावे, तालुका पातळीवर निदर्शने होणार नाहीत, अशा सूचना दिल्या आहेत. बैठकीत सतीशचंद्र कांबळे, रवी जाधव, चंद्रकांत यादव, बाबूराव कदम, वसंतराव पाटील, रमेश वडणगेकर, दिलदार मुजावर, नामदेव पाटील, सुशांत बोरगे, बाळासाहेब बर्गे यांनी सहभाग घेतला.