कोल्हापूर : शहरातील वाढते नागरिकीकरण आणि त्यास द्याव्या लागणाऱ्या पायाभूत सुविधा, तसेच शहरातील विविध विकासकामे याबाबत चर्चा करण्याकरिता महानगरपालिका लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना चर्चेसाठी वेळ देण्यात यावी, अशी विनंती महापौर अश्विनी रामाणे यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. एलबीटीबाबत आर्थिक उलाढालीची मर्यादा वाढविल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. साहजिकच पायाभूत कामे, महसुली कामे, तसेच पर्यटनास उत्तेजन देण्याच्या उद्देशाने ऐतिहासिक स्थळांचा विकास, अंबाबाई मंदिर परिसर विकासाची कामे करण्यावर मर्यादा आलेल्या आहेत. अंबाबाई मंदिर परिसर विकास, केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग कुस्ती मैदान विकासाचा दुसरा टप्पा, भुयारी गटर योजना, पिण्याच्या पाण्याच्या वितरण नलिका टाकणे, शाहू मिल जागेवरील स्मारक, सेफ सिटीचा दुसरा टप्पा, नर्सरी बागेतील शाहू समाधीस्थळ, आदी विविध कामांसाठी निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. म्हणूनच त्यावर चर्चा करण्यास वेळ व तारीख द्यावी, अशी विनंती महापौर रामाणे यांनी मुख्यमंत्र्यांना केली. मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात उपमहापौर शमा मुल्ला, महिला बालकल्याण सभापती वृषाली कदम, गटनेते सुनील पाटील, सत्यजित कदम, आदींचा समावेश होता.
विकासकामांच्या चर्चेसाठी वेळ द्या
By admin | Published: June 27, 2016 12:18 AM