लोकमत न्यूज नेटवर्क --आंबा : पावसाळा सुरू झाल्याने कडवी नदी स्वच्छतेचे पहिल्या टप्प्यातील अभियान थांबविण्यात आले आहे. मात्र, पावसाळ्यानंतर पुन्हा नव्या जोमाने मोहीम सुरू करण्यापूर्वी शेतकरी व लाभक्षेत्रातील ग्रामस्थांनी नदी स्वच्छता जागृतीची मशाल हाती घ्यावी, असे आवाहन ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी केले. केर्ले येथे जनजागृती फलक अनावरणप्रसंगी ते कृती समितीच्या कार्यकर्त्यांशी बोलत होते. केर्लेचे सरपंच शिवाजी पाटील यांनी स्वागत केले.कडवी नदीवरील हुंबवली पूल व केर्ले या दरम्यानच्या नदीपात्राची भोसले यांनी स्वत: पाहणी करून लोकसहभाग व ग्रामश्रमदानातून दोन किलोमीटर राबविलेल्या स्वच्छता मोहिमेचे कौतुक केले. आतापर्यंत नदी प्रवाहातील अडथळे दूर करताना सुमारे तीन हजार फूट लांब व सुमारे सत्तर फूट रुंदीचे पात्र मोकळे केले आहे. त्यामुळे नदीपात्रालगतच्या परिसरात पाणी पात्राबाहेर पडण्याचे प्रमाण कमी होऊन शेतीची हानी थांबणार आहे. हे संदर्भ हाती घेऊन या मोहिमेचे फायदे अभ्यासण्याचे कार्यकर्त्यांना सुचविले. या मोहिमेमुळे कडवी खोऱ्यातील मानोली ते मलकापूर या दरम्यानचा २0 किलोमीटरचा नदीकाठ व परिसरातील हजारो शेतकऱ्यांच्या शेतीची धूप थांबून पिकांची हानी टळणार आहे. एप्रिल व मेमध्ये राबविलेल्या पहिल्या टप्प्यातील मोहीम पावसाला सुरुवात झाल्याने गुरुवारी थांबविण्यात आली. पुढील टप्प्यात जानेवारीतच ही मोहीम लवकरच सुरू करण्याची गरज संपादक भोसले यांनी व्यक्त केली.जलदिंडी, पुराप्रसंगी होणारी हानी, दुर्घटना यांची वेळीच दखल सामान्यांपर्यंत पोहोचवून नदी स्वच्छतेचे गांभीर्य व गरज मांडावी. त्या जागृतीसाठी डिजिटल फलक, स्पर्धा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे श्रमदान या माध्यमातून नदी वाचविण्याचे भान रुजविणारी दिशा संपादक भोसले यांनी दिली. यावेळी केर्ले तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गणेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते शिराज शेख (लव्हाळा), धोंडिबा तवलके (आठखूरवाडी), ऋषिकेश काळे (तळवडे) यांनी झालेल्या कामाचा आढावा त्यांच्यासमोर मांडला. ग्रामपंचायत सदस्य अनिल गवरे (आंबा), बाबासोहब जाधव (आठखूरवाडी), नथुराम जाधव, अरविंद कल्याणकर (हुंबवली) यांनी नदीची पूर्व अवस्था मांडली. यावेळी मारुती पाटील, बापू जाधव, संदीप मोरे (चाळणवाडी), संदीप पाटील (केर्ले), लक्ष्मण पाटील (घोळसवडे), आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आर. एस. लाड यांनी आभार मानले.‘लोकमत’मुळे दिशा...कडवी नदीच्या पुनरुज्जीवनाचा प्रश्न ‘लोकमत’ने वेळोवेळी मांडून या नदीच्या दुरवस्थेचे गांभीर्य ‘लोकमत’चे प्रतिनिधी आर. एस. लाड यांनी शेतकऱ्यांसमोर ठेवले. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना दिशा मिळाली व मोहीम सुरू झाली. या मोहिमेला ‘लोकमत’ने अखेरपर्यंत पाठीशी राहावे, अशी अपेक्षा डी. बी. चव्हाण सेवा ट्रस्टचे संचालक ऋषिकेश काळे यांनी समारोपप्रसंगी व्यक्त केली.नदी पुनरुज्जीवनासाठी सदैव पाठीशीकडवी नदी शेतकऱ्यांची जीवनवाहिनी असल्याने या भागाचे लोकप्रतिनिधी खासदार राजू शेट्टी, आमदार सत्यजित पाटील, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याशी बोलून या मोहिमेला गती देऊ, तसेच ‘लोकमत समूह’ या नदीच्या पुनरुज्जीवनासाठी सदैव पाठीशी राहील, असा विश्वास संपादक वसंत भोसले यांनी यावेळी दिला. त्याचवेळी या मोहिमेचा लेखाजोखा छायाचित्रांसह भोसले यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना कळविला.
कडवी नदी स्वच्छतेच्या जागृतीची मशाल हाती घ्या
By admin | Published: June 09, 2017 1:15 AM