कोल्हापूर : सामाजिक समतेची मशाल प्रज्वलित करणारा कोल्हापूर हा एकमेव जिल्हा आहे. हे काम जिल्ह्यापुरतेच न राहता ते देशभर न्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी गुरुवारी येथे केले. प्रत्येक समाजाने अशी परिषद घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त समता व सामाजिक न्याय वर्षानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्र्टी), पुणे यांच्यातर्फे येथील शाहू स्मारक भवनात समता परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी विविध सामाजिक संघटना व समाज प्रतिनिधी यांच्यासमवेत समतेची मशाल प्रज्वलित करून जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, ‘बार्र्टी’चे प्रकल्प संचालक मोहन शेलटे, गंगाधर गायकवाड, हंबीरराव कांबळे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, विभागीय जात पडताळणी समितीच्या सदस्य-सचिव वृषाली शिंदे, ‘समाजकल्याण’चे विशेष अधिकारी विशाल लोंढे, सेवानिवृत्त न्यायाधीश दिनकरराव कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक शिवाजी राऊत, प्रा. शहाजी कांबळे उपस्थित होते. जिल्हाधिकारी सैनी म्हणाले, कोल्हापूरला समतेचा विचार देणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा वारसा लाभलेला आहे. याच ठिकाणाहून जवळपास ८० समाजांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत समतेची प्रज्वलित झालेली ही मशाल राज्याच्या व देशाच्या कानाकोपऱ्यांत जावी. प्रत्येक समाजात समता प्रस्थापित व्हावी, यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत. कायद्याने अनुशासन होते, तर समतेने विविध जातींमधील प्रेम वृद्धिंगत होते.‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज व समता’ या विषयावर डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, महात्मा फुले, राजर्षी शाहू आणि डॉ. आंबेडकर यांनी समतेसाठी संघर्ष केला. या संघर्षाचा महाराष्ट्रात पहिला उद्रेक महात्मा फुले यांच्या विचारातून आला. विषमतेची जाणीव व त्यातून बसणाऱ्या चटक्यांमधून समतेचा विचार पुढे येतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्त्वत्रयीमधूनच सामाजिक न्याय तयार होतो. १९१९ साली राजर्षी शाहू महाराजांनी चार जाहीरनामे काढले. त्याकाळी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजाला आदर, ममता आणि समतेने वागविण्याची त्यांनी शिकवण दिली. १९०२ साली राजर्षी शाहूंनी मागासवर्र्गीयांना ५० टक्के आरक्षण दिले. समतेच्या विचारासाठी शिक्षणप्रसारावर भर दिला. शिवाजी राऊत यांनी माहिती अधिकार कायदा : गरज, अंमलबजावणी व विविध कलमांची सविस्तर माहिती देऊन हा अधिकार म्हणजे सामान्य माणसाला देण्यात आलेल्या मूलभूत अधिकारांमध्ये सर्वांत श्रेष्ठ अधिकार असल्याचे सांगितले.वसंतराव मुळीक, दिनकरराव कांबळे, शाहू कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. मोहन शेलटे यांनी प्रास्ताविक केले. विशाल लोंढे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. हरीश भालेराव, बबनराव रानगे, बाळासाहेब भोसले, आदींसह विविध समाजांचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)माणगाव स्मारकासाठी शासनाकडे निधी मागू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. माणगाव परिषदेच्या स्मारकासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी यावर्षी शासनाकडे निधी मागू, असे जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी सांगितले.
सामाजिक समतेची मशाल देशभर न्या
By admin | Published: March 04, 2016 12:40 AM