कोल्हापूर : कमला कॉलेजची धावपटू आसमा अजमल कुरणे हिने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ताराराणी विद्यापीठ ते जयसिंगपूर असे ७२ कि.मी.चे अंतर ९ तास २८ मिनिटात पूर्ण करीत नवा विक्रम प्रस्थापित केला.सकाळी सहा वाजता या उपक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून झाली. रेल्वे उड्डाण पूल, ताराराणी चौक, तावडे हॉटेल चौक, कोल्हापूर सांगली फाटा, हेर्ले, चोकाक, अतिग्रे, हातकणंगले आणि सांगली फाटा (जयसिंगपूर) पुन्हा कोल्हापूरकडे असे ७२ कि.मी.चे अंतर आसमाने न थांबता पार केले.
तिने जीपीएस प्रणालीचा वापर करीत वेळेचीही नोंद ठेवली. तिच्या उपक्रमाची दखल नॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये लवकरच होईल. या उपक्रमात दोन वेळा पायाच्या नसा दुखावणे, आदी समस्यांना सामोरे जावे लागले. तरीही तिने हा उपक्रम न थांबता पार केला. तिने हा उपक्रम क्रीडाशिक्षक शामराव मासाळ, प्रा. ज्योती गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली केला. तिला प्राचार्या तेजस्विनी मुडेकर, सचिव प्राजक्त पाटील, डॉ. आझाद नायकवडी आदींचे प्रोत्साहन लाभले.