इचलकरंजी : वारणा धरण प्रकल्पात शेती सिंचनाला ‘पुरून उरेल’ इतका पाणीसाठा असल्याचा विश्वास शासनाने वारणा नदीकाठावरील ग्रामस्थांना दिला पाहिजे. त्याचबरोबर इचलकरंजी शहराला पाणी मिळाले पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील प्रमुख नेत्यांची तातडीने बैठक घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
इचलकरंजीला वारणा नदीतून पाणी देण्यासाठी वारणा बचाव कृती समिती व इचलकरंजीवासीय अशा दोन्ही बाजूंनी आंदोलनाला तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या दालनात नगरपालिकेतील प्रमुख पदाधिकारी व नगरसेवकांच्या बैठकीत खासदार शेट्टी बोलत होते. नगराध्यक्षा स्वामी यांनी आयोजित केलेल्या मंगळवार (दि. ८)च्या सर्वपक्षीय बैठकीला शेट्टी उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांनी गुरुवारी नगरपालिकेमध्ये येऊन नगराध्यक्षा व नगरसेवकांशी संवाद साधला.
वारणेच्या पाण्यासाठी सध्या सुरू असलेला संघर्ष दुर्दैवी आहे, असे सांगून खासदार शेट्टी म्हणाले, वारणा धरणामध्ये सहा ते सात टीएमसी पाणी अतिरिक्त असल्यामुळे मान्सून पाऊस सुरू होत असताना सोडून द्यावे लागते. वारणाकाठच्या लोकांना शासनाच्या जलसंपदा खात्याकडील अधिकाऱ्यांनी धरणामध्ये अतिरिक्त पाणी असल्याचा विश्वास पटवून दिला पाहिजे. ज्यामुळे इचलकरंजीला पाणी दिल्यास वारणाकाठच्या शेतकºयांची फसवणूक होणार नाही, हा दिलासा मिळेल, असेही शेट्टी यांनी सांगितले.
सुरुवातीला पाणीपुरवठा समितीचे सभापती नितीन जांभळे यांनी स्वागत केले. जलअभियंता अजित साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. शशांक बावचकर म्हणाले, वारणा धरणात आरक्षित असलेल्या पिण्याच्या पाण्यापैकी एक टीएमसी पाणी शासनाने आरक्षित केले आहे. तेच पाणी मिळावे, अशी आमची मागणी आहे. विठ्ठल चोपडे म्हणाले, पंचगंगा नदीच्या प्रदूषणामध्ये एकट्या इचलकरंजीचाच समावेश नसून, कोल्हापूर शहरासह ग्रामीण परिसर व औद्योगिक वसाहतींचा त्यामध्ये सहभाग आहे. सागर चाळके यांनी, वारणा बचाव कृती समितीने विरोध करताना टोकाची भूमिका घेतली आहे, असे विषद केले. बैठकीमध्ये अजित जाधव, तानाजी पोवार, रवींद्र माने, आदींनीही हक्काचे असलेले वारणा नदीतील पाणी मिळावे, अशी मागणी मांडली. बैठकीला नगरसेवक उपस्थित होते.बैठकीतच श्रेयवादावरून जुंपलीनगरपालिकेतील या बैठकीतच भाजपचे पक्षप्रतोद तानाजी पोवार व कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील यांच्यात वारणा नळ योजनेवरून श्रेयवाद रंगला. त्यामुळे बैठकीत काही काळ गोंधळ उडाला होता. पोवार यांच्या म्हणण्यानुसार शहर विकास आघाडी सत्तेवर असताना वारणा नळ योजनेचा प्रकल्प तयार करण्यात आला होता. तर पाटील यांनी, कॉँग्रेसच्या कालावधीतच वारणा नळ योजना प्रकल्प शासनाने मंजूर केला होता, असे म्हणणे मांडले. यावरून वाद झाला. त्यामध्ये अखेर खासदार शेट्टी यांनी मध्यस्थी करीत वाद मिटविला.इचलकरंजीतील नगराध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीत बोलताना खासदार राजू शेट्टी. यावेळी नगरसेवक विठ्ठल चोपडे, शशांक बावचकर, सुनील पाटील, अशोकराव जांभळे, अजित जाधव, उपनगराध्यक्षा सरीता आवळे, नगराध्यक्षा अलका स्वामी, रवींद्र माने, मनोज हिंगमिरे, आदी उपस्थित होते.