कोल्हापूर : विमान उड्डाण परवान्याचे नूतनीकरण, धावपट्टीची दुरुस्ती, आदी कारणांमुळे गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेली कोल्हापूरची विमानसेवा पुन्हा सुरू होण्याची आशा पल्लवीत झाली आहे. केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेत कोल्हापूरचा समावेश करण्यात आला. त्यामुळे ‘कोल्हापूर-मुंबई’ प्रवास अडीच हजार रुपयांत करता येणार आहे.
सामान्य नागरिकांना विमान प्रवास शक्य व्हावा, या उद्देशाने व छोटी शहरे विमान सेवेने जोडण्याची महत्त्वाकांक्षी योजना ‘उडान’मध्ये महाराष्ट्रामधील पाच शहरांचा समावेश केला आहे. यामध्ये कोल्हापूर, नांदेड, नाशिक, जळगाव आणि सोलापूर ही शहरे समाविष्ट केली असल्याचे नागरी विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती यांनी जाहीर केला.
योजनेअंतर्गत देशातील ४५ मार्गांचा समावेश असून एक तासापर्यंतचा विमान प्रवास करता येणार आहे. जे प्रवासी तिकिट आरक्षित करतील अथवा प्रथम येतील त्यांना अडीच हजार रुपयांच्या योजनेचा लाभ मिळणार आहे. संबंधित सेवा पुरविणाऱ्या विमानातील एकूण जागांपैकी अर्ध्या जागा अडीच हजार रुपयांसाठीच्या असणार आहेत. धावपट्टीची दुरुस्ती, विमान कंपन्यांचा नकार, विमान उड्डाण परवान्याचे नूतनीकरण, आदी कारणांमुळे गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेली कोल्हापूरची विमानसेवा पुन्हा सुरू होण्याच्या दिशेने सरकारकडून सकारात्मक पाऊल पडले आहे. (प्रतिनिधी)
विमानसेवा बंद असलेल्या कोल्हापुरातील पर्यटन, उद्योग, आदी क्षेत्रांच्या विकास काहीसा ठप्प झाला आहे. मात्र, ‘उडान’ योजनेद्वारे कोल्हापुरातून विमानसेवा सुरू होण्याचा चांगला निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने येथील विकासाला चालना मिळेल. अडीच हजार रुपयांत विमानप्रवासाला चांगला प्रतिसाद मिळेल. लवकरात लवकर ही सेवा सुरू होणे आवश्यक आहे.- बी. व्ही. वराडे, पर्यटनतज्ज्ञ