शिरोळ : स्वतःची मिळकत आहे असे भासवून सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ (ता. मिरज) येथील एकाने शिरोळ येथील स्टेट बँकेच्या शाखेला तारण देऊन ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. अशोक मारुती कोरवी असे संशयिताचे नाव असून, शिरोळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, म्हैशाळ येथील संशयित अशोक कोरवी याने सिटी सर्व्हे नंबर २७३ मिळकत ही स्वतःची आहे असे बँकेला भासविले होते. त्याने सदरची मिळकत स्वतःच्या मालकीची नसताना शिरोळ स्टेट बँक शाखेला तारण देऊन ३९ लाख रुपयांचे कर्ज घेतले. या कर्जाची रक्कम २५ जुलै २०१९ रोजी बँकेच्या खात्यामधून उचलले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अशोक कोरवी यांनी कर्जाची रक्कम उचल केल्यानंतर आजअखेर कर्ज व त्यावरील व्याज रकमेची बँकेला परतफेड केलेली नाही. यामुळे हे कर्ज थकीत झाले असल्याने या थकबाकीच्या रक्कम वसुलीबाबत शिरोळ स्टेट बँके शाखेने संबंधित कर्जदाराची पडताळणी केली असता संशयित आरोपी कोरवी यांनी बँकेची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे बुधवारी शिरोळ पोलिसांत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार स्टेट बँक शिरोळ शाखेचे शाखाधिकारी सचिन कुलकर्णी यांनी शिरोळ पोलिसांत दिली आहे.दरम्यान, संशयित कोरवी याने शिरोळ तालुक्यातील पूर्व भागातील एका नामांकित पतसंस्थेलाही सदरची मिळकत तारण दाखवून कर्जापोटी लाखो रुपये उचलल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे ही संस्थाही आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता असून, पोलिसांनी त्या संस्थेबरोबरच अन्य काही संस्थेमध्ये अशा प्रकारच्या फसवणुकीचा प्रकार झाला आहे का ? या दिशेने तपास सुरू केला आहे.
Kolhapur: स्वत:ची मालमत्ता असल्याचे भासवून ३९ लाखांचे कर्ज उचलले, शिरोळमध्ये स्टेट बँकेची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 1:41 PM