कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुसऱ्या डोसमुळे अनेकांचा जीव वाचल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिला डोस घेतल्यानंतरही कोरोना झालेल्या जिल्ह्यातील ७५ जणांचा मृत्यू झाला असून दुसरा डोस घेतल्यानंतर मात्र एकही मृत्यू झाला नसल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. लस घेतल्यावर आपल्यावर काहीतरी होईल म्हणून मागे सरलेल्या नागरिकांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा निष्कर्ष आहे. दोन डोस घेतल्यानंतर व्यक्तीची प्रतिकारक्षमता वाढत असल्याने शासनानेही आता प्राधान्याने दुसऱ्या डोसचे लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.
जिल्ह्यामध्ये १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरणास प्रारंभ झाला. मात्र सुरूवातीच्या काळात आरोग्य कर्मचारी सुद्धा ही लस घेण्यास इच्छुक नव्हते. सीपीआर मधील कर्मचाऱ्यांनी लस घ्यावी म्हणून त्यांना समजावून सांगा असे शेवटी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना सांगावे लागले.
गेल्या पावणेचार महिन्यात जिल्ह्यातील पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्या रूग्णांपैकी १,६८३ जणांना पुन्हा कोरोनाची लागण झाली. लस घेतल्यानंतर पहिल्या पंधरा दिवसातच यातील १,१५२ जणांना कोरोना झाला. यानंतर पहिल्या आठवड्यात ३५, दुसऱ्या आठवड्यात २३ तर तिसऱ्या आठवड्यात १५ जणांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे पहिला डोस घेतलेल्या एकूण ७५ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
दुसरा डोस घेतल्यानंतर १६७ जणांना कोरोनाची लागण झाली. यातील ५२ जण पहिल्या आठवड्यातच बाधित झाले. परंतु यानंतर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यात एकही नागरिकाचा मृत्यू झालेला नाही. ही मोठी दिलासादायक बाब आहे.
चौकट
जिल्ह्यातील आरोग्य संस्था : ९०
पहिला डोस घेतलेले नागरिक : ८ लाख ९० हजार २४६
दुसरा डोस घेतलेले नागरिक : २ लाख २३ हजार १२७
पहिल्या डोसची टक्केवारी : २६ टक्के
दुसऱ्या डोसची टक्केवारी : ६ टक्के
पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना बाधित : १५१६
पहिला डोस घेतल्यानंतर झालेले मृत्यू : ७५
दुसरा डोस घेतल्यानंतर कोरोना बाधित : १६७
दुसरा डोस घेतल्यानंतर झालेले मृत्यू : ००