जयसिंगपूर : चंदूर-टाकळीदरम्यान कृष्णा नदीवर सुरू असलेल्या पुलाच्या भरावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकसानीबाबत महाराष्ट्र-कर्नाटक या दोन्ही शासनाच्या समन्वयाने शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथे शेतीचे नुकसान झालेल्या भागाची पाहणी मंत्री यड्रावकर यांनी केली. या वेळी कर्नाटकचे आमदार गणेश हुक्केरी, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे प्रमुख उपस्थित होत्या.
मंत्री यड्रावकर म्हणाले, येथील कृष्णा नदीवर महाराष्ट्र व कर्नाटक दळणवळण जोडण्यासाठी बारा गाळ्यांच्या पुलाचे काम सुरू आहे. दहा ते पंधरा फूट मुरमीकरणाचा बांध घातला आहे. टाकळीकडील दोन गाळे रिकामे आहेत. अतिवृष्टीमुळे पंचगंगा, दूधगंगा व कृष्णा या नद्यांचे एकत्र पाणी नदीपात्रात आल्याने तसेच टाकळी ते चंदूर पुलाच्या मुरमीकरणामुळे टाकळीकडील दोन गाळ्यांच्यामधून संपूर्ण पाणी गेले नाही. त्यामुळे नदीपात्राच्या लगतच्या टाकळी हद्दीतील शेतकऱ्यांची शेतजमिनी वाहून गेल्या आहेत. शिवाय नदीवरील विद्युत पंप, पाईप, केबल नदीपात्रात वाहून गेले आहेत.
या वेळी कर्नाटकचे आमदार गणेश हुक्केरी यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कर्नाटक शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले.
याप्रसंगी सभापती दीपाली परीट, हर्षदा पाटील, हरिचंद्र पाटील, रणजित पाटील, उमेश पाटील, श्रीधर भोसले, पोलीस पाटील सुनीता पाटील, संजय पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
फोटो - ०२०७२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील शेतीचे झालेल्या नुकसानीची पाहणी राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली. या वेळी कर्नाटकचे आमदार गणेश हुक्केरी, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.