दत्तवाड : दोन महिन्यांत ४० एकर गायरान जागेत पन्नासहून जास्त घरे बांधून अतिक्रमण झाले. मात्र, प्रशासन जुजबी कारवाईची नोटीस देऊन यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे या अतिक्रमणमागे कोणाचा वरदहस्त आहे, याची उलटसुलट चर्चा असली तरी शिरोळ तहसीलदारांनी या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
टाकळवाडी (ता. शिरोळ) येथील गायरान गट नंबर ५९० मध्ये गेल्या दोन महिन्यांत गावातील ग्रामस्थांनी दोन गुंठ्यांपासून दहा गुंठ्यांपर्यंत प्लॉट पाडून अतिक्रमण केले आहे. या जागेवर रात्रीत घरे बांधली जात आहेत.
ग्रामपंचायत निवडणूक काळात काही उमेदवारांनी संगनमताने ग्रामस्थांना अतिक्रमण करण्यास प्रोत्साहन दिल्याची तक्रारही निवडणूक आयोगाकडे झाली आहे, तर या अतिक्रमणावर रात्रीत घरे बांधण्यासाठी वीट, खडी, सिमेंट पुरवून मते मागितली, अशीही तक्रार करण्यात आली होती. ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच व सदस्यांनी या अतिक्रमणाला प्रोत्साहन दिल्याची तक्रारही झाली आहे.
गायरान जमिनीची देखभाल दुरुस्ती व संरक्षणाची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनावर असते. मात्र, ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य या जमिनीचे संरक्षण न करता ग्रामस्थांना जमिनी वाटप करीत असल्याची तक्रार तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ व गटविकास अधिकारी शंकर कवितके यांच्याकडे करण्यात आली आहे, तर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत उपोषणाचा मार्ग अवलंबल्यानंतर नोटिसा देऊन पडदा टाकण्याचे काम प्रशासन करीत असल्याचा आरोप होत आहे.
---------------
कोट - सरपंच व सदस्य स्वत:च्या स्वार्थासाठी गावच्या विकासासाठी असलेल्या जमिनीचे वाटप ग्रामस्थांना करीत आहेत, ही बाब गंभीर आहे. त्यामुळे तहसीलदार यांनी याबाबत सरपंच, सदस्यांवर कारवाई करून अतिक्रमण हटवावे.
- बाबासो वनकोरे, माजी सरपंच टाकळीवाडी.