गांधीनगर : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील तलाठी कार्यालयात तलाठी आणि सर्कल वेळेत हजर राहत नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांसह ग्रामस्थांना विविध दाखल्यांसाठी ताटकळत थांबावे लागत आहे. त्यामुळे काही संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी तलाठी कार्यालय उघडू न देण्याचा पवित्रा घेतल्याने काही काळ वातावरण गंभीर झाले होते.
गेल्या अनेक महिन्यांपासून या ना त्या कारणास्तव गडमुडशिंगीचे तलाठी व सर्कल सतत बाहेर असतात. कार्यालयातील त्यांची वेळ निश्चित नसल्याने ग्रामस्थांना दाखले किंवा एखाद्या शासकीय योजनेबाबत माहिती वेळेवर मिळत नाही. त्यामुळे अनेक नागरिकांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. काही शालेय विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले, तसेच स्थानिक शेतकऱ्यांना सातबारा उतारे, फेरफार नोंदी, वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनसाठी दाखले लागत असतात. पण, तलाठी आणि सर्कल कार्यालयात वेळेवर हजर राहत नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. नागरिकांना तासनतास डोळ्यात तेल घालून या महसूल अधिकाऱ्यांची वाट पाहावी लागत आहे. संबंधित कार्यालयातील कर्मचाऱ्यांनांही हे महसूल अधिकारी कधी ऑफिसमध्ये येणार हे निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे नागरिकांना दिवस दिवसभर तलाठी कार्यालयात आपला कामधंदा सोडून थांबावे लागत आहे. अशा शासकीय अधिकाऱ्यांना वेळेचे भान आणि कर्तव्याची जाण कधी राहणार असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. काही मर्जीतील लोकांची कामे तत्काळ होतात, पण सामान्यांना मात्र हेलपाटे मारायला लागतात. तलाठी कार्यालयातील गलथान कारभारामुळे सामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांची होणारी ससेहोलपट थांबवावी, तसेच तलाठी कार्यालयातील कारभार सुधारा, अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब पाटील, दिलीप थोरात यांनी दिला.
फोटो : ०५ गडमुडशिंगी तलाठी आंदोलन
ओळ : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील तलाठी कार्यालयात महसूल अधिकारी वेळेत हजर राहत नसल्याने ग्रामस्थांनी तलाठी कार्यालयच उघडू न देण्याचा प्रयत्न केला.