: बुरंबाळी फाटा ते दुर्गमानवाड या रस्त्याला जोडणारा तळगाव - कुदळवाडी रस्ता येत्या महिन्याभरात खड्डेमुक्त न केल्यास गावात कोणत्याही लोकप्रतिनिधीला फिरू देणार नसल्याचा इशारा येथील तरुणांनी गुरुवारी दिला. लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक आमच्या ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप तरुणांनी केला. बुरंबाळी दुर्गमानवाड रस्त्यापासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तळगावचा परिसर दुर्गम आहे. तळगाव - कुदळवाडी या रस्त्याचे एकदाच डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र, त्यावरील डांबर उडून गेल्याने हा रस्ता प्रचंड दयनीय बनला आहे. आमदार फंडातून २०१९ रोजी या रस्त्यावरती नऊ लाख ९९ हजार रुपये खर्च केले असल्याचा रस्त्यावर लावलेला बोर्ड सांगतो. पण प्रत्यक्षात मात्र रस्त्याकडे बघितले असता खरंच हा निधी या रस्त्यावर खर्च झाला आहे का? असा प्रश्न पडतो. या मार्गावर एकच एसटी बस ये जा करत असते. पण रस्त्याची अवस्था फार दयनीय झाल्याने एसटीच्या फेऱ्याही बंद झाल्या आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या गावातील सर्व तरुण मंडळाच्या तरुणांनी एकत्र येऊन गुरुवार रस्त्यासाठी रस्त्यावरती आक्रोश केला.
येत्या महिनाभरात या रस्त्याची डागडुजी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे इशारा या तरुणांनी दिला. यावेळी संजय तवनकर, विठ्ठल पाटील, मारुती पाटील, रमेश कांबळे, सुनील पाटील, शशांक पाटील, साताप्पा नाळे, धनाजी पाटील, सतीश पाटील, युवराज पाटील, किरण पाटील, आदींसह गावातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो: १५ तळगाव रस्ता
ओळी= तळगाव (ता. राधानगरी) येथील तरुणांनी रस्त्यासाठी गुरुवारी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.