कोल्हापूूर : पंचगंगा प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या घटकांवर काय कारवाई करणार ते बोला, खुलासा नको, अन्यथा कुलूप आणले आहे. तुम्हाला कोंडून घालू, असा इशारा शुक्रवारी स्वाभिमानी युवा आघाडी व पर्यावणप्रेमींनी दिला. त्यानंतर पुढील बैठकीत कारवाईचा अहवाल दिला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी त्वरीत उपाययोजना व दोषींवर कारवाई यासंबंधी शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. बैठकीस जिल्हाधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी अधिकारी गैरहजर होते. त्यावर सुरुवातीला जोरदार आक्षेप घेतला. प्रदूषणासंबंधित जिल्हा प्रशासनाला गांभीर्य नसेल तर बैठक का आयोजित केली, असा प्रश्न ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी उपस्थित केला. जोपर्यंत सर्वच विभागाचे सक्षम अधिकारी येणार नाहीत तोपर्यंत बैठक सुरू होणार नाही, असा पवित्रा साऱ्यांनीच घेतला. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी मनिष होळकर यांनी मोबाईलवरून जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. बैठकीला सुरुवात झाली. ‘स्वाभिमानी’चे युवा अध्यक्ष बंडू पाटील यांनी व्यासपीठावर बसलेले सर्वच प्रदूषणाला दोषी असून, चोर आहेत, असा थेट आरोप केला. पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड यांनी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई काय करणार, हे स्पष्ट करावे, अशी मागणी लावून धरली. त्याला साऱ्यांनी पाठिंबा दिला. पंचतारांकित वसाहतीतील दूषित पाण्यामुळे पंचगंगा प्रदूषित होत असल्याचे बंडू पाटील, संदीप बुधवले यांनी निदर्शनास आणून दिले. औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी के. एस. भांडेकर यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. त्यावर शिवसेनेचे विजय देवणे यांनी आधी माहिती घ्या आणि नंतर बोला, अशी समज दिली. ते म्हणाले, भोगावती, कुंभी, दालमिया, रेणुका, राजाराम हे साखर कारखाने मळीमिश्रीत पाणी नदीत सोडत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी.
कारवाईचे बोला, अन्यथा कोंडून घालू
By admin | Published: March 20, 2015 11:28 PM