दत्ता बिडकर --हातकणंगले पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतिपदासाठी १४ मार्चला निवडणूक होत असून, सभापतिपदासाठी भाजप-जनसुराज्य विरुद्ध आवाडे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. भाजपकडून मित्रपक्ष जनसुराज्यला उपसभापती पद देण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, स्वाभिमानी व शिवसेना यांना सामावून घेण्यासाठी पुढील टप्प्यात एक एक वर्ष उपसभापती पद देण्याचे गाजर भाजपकडून दाखविले जात असून, स्वाभिमानी व शिवसेना या आमिषाला बळी पडणार का? हे चार दिवसांत स्पष्ट होणार आहे.हातकणंगले पंचायत समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. पंचायत समितीच्या २२ जागांच्या सभागृहात भाजपला सहा, त्याचा मित्रपक्ष जनसुराज्यला पाच जागा मिळाल्या आहेत. २२ पंचायत समिती सभागृहात ११ जागा या दोन पक्षांना मिळाल्या असून, मॅजिक फिगरसाठी या दोन पक्षांना एक जागा कमी पडत आहे.विरोधी पक्षातही एकवाक्यता नाही. प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी जिल्हा आघाडीला पाच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला तीन आणि शिवसेनेला दोन अशा १0 जागा या समविचारी आघाडीला मिळाल्या आहेत. शिवसेना, स्वाभिमानी, प्रकाश आवाडे गट यांनी आपापसांत निवडून आलेल्या ठिकाणी आघाडी केली होती. रुकडी जिल्हा परिषदेत स्वाभिमानीची जागा जिल्हा परिषदेला निवडून आली आहे, तर रुकडी पंचायत समितीला शिवसेना आणि हेरले पंचायत समितीला स्वाभिमानी निवडून आली आहे. अशीच परिस्थिती पट्टणकोडोली जिल्हा परिषदेत असून, आवाडे गटाने जिल्हा परिषद आणि रुई पंचायत समिती जिंकली आहे, तर पट्टणकोडोली पंचायत समितीची जागा शिवसेनेने जिंकली आहे. यामुळे आवाडे गट, स्वाभिमानी आणि शिवसेना सभापती निवडीमध्ये एकत्र राहण्याची शक्यता आहे, तर या तिन्ही पक्षांच्या आघाडीला एकमेव काँग्रेस पक्षाचे सदस्य पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. असे झाले तर सभापती निवडीमध्ये आवाडे गट, स्वाभिमानी, शिवसेना आणि काँग्रेस अशी सर्वांची बेरीज ११ वर पोहोचत असल्याने याही आघाडीला १२ ही मॅजिक फिगर गाठता येत नाही.‘जनसुराज्य’ला उपसभापती पद : सेनेला पद देण्याची शक्यता१ हातकणंगले पंचायत समितीवर भाजप आघाडीचा प्रथमच सभापती होणार असल्याने भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. २ भाजप-जनसुराज्य या ११ सदस्यांच्या आघाडीला एकमेव सदस्य कमी पडत असल्याने आ. सुरेश हाळवणकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना यांच्याबरोबर तहाची बोलणी सुरू केली आहे. ३ मित्रपक्ष जनसुराज्यला पहिली दोन वर्षे उपसभापती पद, तर शिवसेना आणि जनसुराज्यला उर्वरित तीन वर्षे उपसभापती पद देण्याची चर्चा सुरू आहे. ४ मात्र, हा फॉर्म्युला मान्य होणार का आणि भाजपचे गाजर या दोन पक्षांना पचणी पडणार का? हे येणाऱ्या चार दिवसांत स्पष्ट होणार आहे.
हातकणंगलेत भाजपकडून मित्रपक्षाशी तहाची बोलणी
By admin | Published: March 10, 2017 11:44 PM