लोकमत न्यूज नेटवर्क
बाजारभोगाव : पन्हाळा तालुक्यातील मानवाड येथील सुनीता हरी गुरव त्यांचे पती हरी गुरव काही वर्षांपूर्वी झाडावरून पडून जखमी झाले होते. त्यामध्ये त्यांच्या पाठीचा मणका आणि दोन्ही पाय निकामी झाल्याने उपचारांसाठी जमीन गहाण ठेवून दहा वर्षे उपचार केला. मात्र, चार मुली आणि एक अपंग मुलगा यांचा सांभाळ करताना सुनीता गुरव यांच्या पतीचा २०११ साली मृत्यू झाला. त्यानंतर चार मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडल्याने आज हे कुटुंब आर्थिक विवंचनेत आपले जीवन जगत आहे.
मुलगा सूरज हा इयत्ता अकरावीमध्ये ज्युनिअर कॉलेज कळे मध्ये शिक्षण घेत आहे. एका मुलीचे लग्न झाले असून, तीन मुली लहान असल्याने त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी एका स्त्रीवर पडल्याने कुटुंबाची वाताहात झाली आहे. संजय गांधी निराधार योजनेसाठी वारंवार हेलपाटे मारले; मात्र माझी दखल कोणी घेतली नाही. त्यामुळे आम्ही नेमकं जगायचं कसं आणि न्याय मागायचा कुठं? असे सुनीता गुरव यांनी ‘लोकमत’शी बोलताना भावनिक व्याकूळ होऊन आपली व्यथा मांडली.
चौकट १)
मोलमजुरी करून मी माझ्या मुलांचा शिक्षणाचा खर्च करीत आहे; मात्र त्या पैशावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे शक्य होत नाही. त्यामुळे लहान मुलांचा सांभाळ करणे अवघड होऊन बसले आहे. मोलमजुरी करण्यासाठी तीन वर्षे वयाच्या मुलीला शेताच्या बांधावर झोपवून शेतात काम करताना डोळ्यांसमोर आसवे उभी राहत आहेत.
श्रीमती. सुनीता गुरव मानवाड (गुरववाडी)
चौकट २) सूरज गुरव याने मोठा अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आहे. मात्र, त्याचे वडील मृत झाल्याने गरीब परिस्थितीपुढे हे कुटुंब हतबल झाले आहे. त्यामुळे सूरजच्या शिक्षणासाठी दानशूर व्यक्तीच्या मदतीची गरज आहे.
फोटो ; मानवाड (ता. पन्हाळा) येथील आर्थिक परिस्थितीसमोर हतबल झालेले गुरव कुटुंब.