राजाराम पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : तलेसरा दिवाळखोरीप्रकरणी दररोज नवनवीन माहिती समोर येत असली तरी प्रत्यक्षात हाती काहीच लागत नसल्याने पॉपलीन यंत्रमाग कारखानदार हवालदिल झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांत ११८ तक्रारी दाखल होऊन त्यामध्ये २६.७२ कोटी रुपयांची येणेबाकी आहे, तर यंत्रमाग कारखानदारांच्या खाणेसुमारीनुसार विविध प्रकारच्या ४९८ प्रकारांत ३०.२७ कोटी रुपये देय रक्कम आहे. अशा प्रकारे कोट्यवधी रुपये असूनसुद्धा या प्रकरणास तीन आठवडे उलटले तरी आकड्यांच्या ताळमेळाशिवाय प्रत्यक्षात हातात काहीच नाही, अशी विचित्र स्थिती आहे.येथील जी. तलेसरा या कापड पेढीकडून पॉपलीन या प्रकाराचे कापड विकत घेऊन ते बालोत्रा - राजस्थान येथे पाठविले जात असे. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ सदरची व्यापारी पेढी इचलकरंजीतील कापड बाजारात कार्यरत होती.शहरात व विटा (जि. सांगली) येथे तयार होणाऱ्या पॉपलीन कापडापैकी सुमारे साठ टक्के कापड या पेढीकडून खरेदी केले जात असे. त्यामुळे पेढीचा एकूण खरेदी-विक्रीचा आवाकासुद्धा मोठा होता. दररोज सव्वा कोटी रुपयांचे पेमेंट या पेढीकडून केले जात असे, असे सांगण्यात येते.अशा या कापड पेढीकडून देण्यात येणारे धनादेश एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात न वटता परत येऊ लागल्याने पॉपलीन कापड उत्पादक यंत्रमागधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली. तलेसरा कापड व्यापारी पेढीचे प्रमुख गौतमकुमार तलेसरा यांचे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस निधन झाल्यानंतर त्यांच्या मुलांकडून या पेढीचे व्यवहार पुढे चालू ठेवले होते. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या पेढीवरील व्यवहार सुरळीतपणे सुरू होते. मात्र, त्यानंतर पेढीने दिलेले धनादेश बॅँकेतून परत येऊ लागल्यामुळे या पेढीला कापड देणाऱ्या यंत्रमागधारकांबरोबर काही कापड व्यापारीसुद्धा हबकून गेले.तलेसरा कापड पेढीला कापड देणारे यंत्रमागधारक एकत्रित येऊ लागले. चौकशी केली असता तलेसरा हे इचलकरंजीतून बेपत्ता झाल्याचे समजले. काही बड्या यंत्रमागधारकांचे कोट्यवधी रुपयांचे पेमेंट अडकल्यामुळे हे यंत्रमागधारक तलेसरा यांच्या मूळ गावी बालोत्रा येथे गेले, तेथे शोधाशोध केली. मात्र, या प्रकारात तलेसरा यांचे मामा व काका हेच या यंत्रमागधारकांना सामोरे गेले. तेथे यंत्रमागधारकांच्या येण्या-जाण्याविषयी खातरजमा करण्याचे काम आठवडाभर चालले. दरम्यानच्या काळात खासदार राजू शेट्टी व आमदार सुरेश हाळवणकर यांनी यंत्रमागधारकांची रक्कम परत मिळावी, म्हणून आपापल्या परीने प्रयत्न सुरू केले. आठवडाभर बालोत्रा येथे गेलेल्या यंत्रमागधारकांना मात्र हातात काहीच मिळाले नाही. म्हणून ते इचलकरंजीला परतले. दरम्यान, इचलकरंजी पोलिसांकडे ११८ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये २६.७२ कोटी रुपयांच्या कापडाचे पेमेंट मिळाले नाही, असे यंत्रमागधारकांनी नमूद केले. आता इचलकरंजीतील यंत्रमागधारक एकत्रित आले असून, त्यांनी या प्रकरणात अडकलेल्या यंत्रमागधारकांची यादी तयार केली आहे.त्यामध्ये यंत्रमागधारकांच्या एकत्रित ताळमेळानुसार ४९८ प्रकारामध्ये ३०.२७ कोटी रुपयांची रक्कम तलेसरा यांच्याकडून येणे असल्याचे नमूद केले आहे. अशा प्रकारे तलेसरा प्रकरण उदयास येऊन तीन आठवडे लोटले तरी यंत्रमागधारकांची यादी काढणे आणि येण्या-देण्याचा ताळमेळ घालणे या पलीकडे प्रत्यक्षात काहीच घडलेले नाही. अशा तऱ्हेची विचित्र कोंडी यंत्रमागधारकांची झाली आहे. नुकसानीच्या गूढ प्रश्नांची चर्चायंत्रमागधारकांकडून कापड विकत घेऊन त्याची पाली-बालोत्रा येथे विक्री करण्यासाठी अडत व्यापाऱ्यांकडून ठरावीक दलाली घेतली जाते. अडत व्यापारी कोट्यवधी रुपयांचा कापड माल विकत घेतात आणि ते कापड राजस्थानला पाठविले जाते. असे होत असले तरी अडत व्यापारी हा फक्त दलालीचा मालक असल्यामुळे तलेसरा प्रकरणात नुकसान कसे झाले? आणि दिवाळखोरीचा प्रकार कसा घडला ? याच गूढ प्रश्नांची चर्चा येथील कापड बाजारात आहे.
तलेसराप्रकरणी चर्चा फक्त आकडेवारीचीच
By admin | Published: May 08, 2017 1:06 AM