लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील आंबर्डे गावातील नागरिक व महिला यांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे. गावातील नागरिकांना पंधराशे रुपये पाण्याचा टँकर, तर दोनशे रुपये पाण्याचे बॅरेल विकत घ्यावे लागत आहे. शासनाच्या तहसील व पंचायत समिती कार्यालयात निवेदन देऊनदेखील दखल घेतलेली नाही. ग्रामस्थ व महिला जनआंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. शासनाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.शाहूवाडी तालुक्याच्या ठिकाणापासून पंधरा किलोमीटर अंतरावर आंबर्डे गाव आहे. या गावात चार वाड्या व दोन धनगरवाडे मिळून गाव वसले आहे. गावची लोकसंख्या २७०० एवढी आहे. गावातील नागरिकांसाठी शासनाच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ४९ लाख रुपयांची पाणी योजना बांधली होती. मात्र, ठेकेदाराने सदर योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे योजना बंद आहे. डोंगरातून सायफन पद्धतीच्या योजनेचे गाव पाणी पित होते; मात्र या योजनेचे पाणी कमी झाले आहे.आंबर्डे गावासह करपेवाडी, वाणेवाडी, रणवरेवाडी, आंबेवाडी आदींसह दोन धनगरवाडे यांचा समावेश आहे. गावासाठी दोन पाणी योजना असूनदेखील एक नादुरुस्त, तर दुसरी पाणी कमी झाल्यामुळे बंद आहे. गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तरीदेखील पिण्याचे पाणी मिळत नाही. गेले पंधरा दिवस गावात पाणीटंचाई जाणवत आहे. नागरिकांना दररोज पंधराशे रुपये मोजून पाण्याचा टँकर विकत घ्यावा लागत आहे. दोनशे रुपयांना पाण्याचे बॅरेल विकत घ्यावे लागत आहे. अधिकाऱ्यांना निवेदने : तरीही दखल नाही१ धनगरवाडे, वाड्या-वस्त्यांतील नागरिकांना पाण्यासाठी चार ते पाच किलोमीटर अंतरावर वणवण भटकावे लागत आहे. धनगरवाड्यावरील नागरिक व महिला यांना ओढ्याचे दूषित पाणी प्यावे लागत आहे. लग्न समारंभासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे. या नागरिकांना उन्हाळ्यात दरवर्षी पाणीटंचाई जाणवत आहे.२ ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी शाहूवाडी तहसील कार्यालय, पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय यांना वेळोवेळी निवेदने देऊनदेखील संबंधित अधिकारी यांनी दखल घेतलेली नाही. ३ शासनाने तहसील कार्यालय यांना पाणीटंचाई असणाऱ्या गावात पाण्याचे टँकर पुरविण्याचे आदेश दिले आहेत. तरीदेखील लाल फितीच्या कारभाराचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. शासनाच्या संबंधित विभागाने आमची दखल घेतली नाही, तर जनआंदोलन करण्याचा इशारा सरपंच लक्ष्मी भोसले यांनी दिला आहे.गेले आठ दिवस शाहूवाडी तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालयातील अधिकाऱ्यांना भेटून निवेदने देऊनही आमची दखल घेतलेली नाही. त्यामुळे तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार. - सूर्यकांत पाटील, माजी सरपंच
पंधराशे रुपयाला पाण्याचा एक टँकर
By admin | Published: May 25, 2017 12:10 AM