औंध : गावागावांतील तंटे गावातच मिटवावेत, गावोगावी शांतता नांदावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. त्यानुसार प्रत्येक गावात तंटामुक्त समित्या स्थापन करण्यात आल्या. या मोहिमेला प्रारंभी उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांपासून खटाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये तंटामुक्त मोहीम थंडावली आहे.
गावातील तंटामुक्त समित्या केवळ कागदांवरच राहिल्या असल्याने तंट्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे तंटामुक्तीची चळवळ गतिमान करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. विविध कारणांवरून निर्माण होणारे तंटे वेळीच मिटवले नाहीत तर ते मोठे स्वरूप धारण करतात. गावागावांत शांतता नांदावी, यासाठी दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी २००६ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली.
ग्रामीण भागात सुरू केलेली मोहीम यशस्वीरीत्या सुरू झाल्यानंतर काही वर्षे प्रभावीपणे राबविण्यात आली.अनेक गावांमध्ये घराच्या, शेतीच्या हद्दीवरून तसेच वादावादीच्या प्रकारातून तसेच क्षुल्लक कारणांवरून भांडणे, तंटे मोठ्या प्रमाणात निर्माण होतात, राजकीय हेवेदावे, गैरसमजुतीतून होणारी ही भांडणे पोलीस प्रशासन तसेच नंतर न्यायालयीन कचाट्यात अडकतात, यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान, मानसिक त्रास, वेळेचा अपव्यय संबंधितवादी प्रतिवादींना सहन करावे लागतात, यासाठी तंटामुक्त समिती संकल्पना मागील सात-आठ वर्षांत प्रभावीपणे राबविण्यात आली. मात्र त्यानंतर या समित्या कागदावरच राहिल्या असून, अनेक गावांमध्ये त्या आहेत का नाहीत, हेसुद्धा समजत नाही. त्यामुळे तंटामुक्त मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी शासनाने या समित्यांचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे बनले आहे.क्षुल्लक तक्रारी पोलीस ठाण्यात दाखलतंटामुक्त मोहिमेंतर्गत मागील काही वर्षांत गावातील तक्रारींचे निवारण समिती करीत होती. त्यामुळे तक्रादारांचा वेळ व पैशाची बचत होत होती. गावातच तंटे मिटल्याने तक्रारदारांची पुन्हा गुण्यागोविंदाने वाटचाल सुरू असायची; परंतु गेल्या काही दिवसांत क्षुल्लक कारणावरून देखील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होत आहेत.ग्रामसभेच्या मान्यतेने निर्णय घ्यावा...तंटामुक्त समितीला शासनाने बळ देण्याची गरज असून, कमीतकमी तंटे झाल्यास गावागावात शांतता प्रस्थापित होईल, तसेच पूर्वीचे तंटामुक्त गाव पुरस्काराचे स्वरूप व्यापक करून वॉटरकप स्पर्धेसारखी तंटामुक्त गाव स्पर्धा लावणे गरजेचे बनले आहे. तथापि जे सदस्य समितीच्या बैठकांना उपस्थित राहत नसतील, समितीच्या कामकाजात अडथळा निर्माण करीत असतील, अशा सदस्यांना बदलून नवीन सदस्य घेण्याबाबत प्रत्येक वर्षाच्या १५ आॅगस्टनंतरच्या पहिल्या ग्रामसभेमध्ये ग्रामसभेच्या मान्यतेने निर्णय घेता येईल.तंटे मिटविण्यास सहकार्य करावे...सद्य:स्थितीत प्रत्येक गावात तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष बदलण्याची ग्रामसभेला आवश्यकता वाटत असेल तर अध्यक्ष बदलून नवीन अध्यक्षाची निवड करावी, अन्यथा तोच कायम ठेवावा, या समितीमध्ये महिलांना ३० टक्के प्राधान्य द्यावे. तंटामुक्त गाव समित्यांनी गावातले तंटे गावातच मिटवत राहावे. महसूल आणि पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी गावभेटी व दौऱ्याचे वेळी तंटामुक्त गाव समित्यांना मार्गदर्शन करून तंटे मिटविण्यास सहकार्य करावे.