कोल्हापूर : गेल्या महिनाभरात लालभडक टोमॅटोने ग्राहकांना चांगलाच झटका दिला आहे; पण या आठवड्यात टोमॅटोची आवक थोडी वाढल्याने घाऊक बाजारात ५० रुपयांपर्यंत पोहोचलेला टोमॅटोचा दर सरासरी २६ रुपयांपर्यंत खाली आला आहे. भाजीपाल्याची आवक ६०१ क्विंटल वाढल्याने श्रावण असतानाही दराने फारशी उचल घेतलेली नाही. कडधान्याच्या दरांत थोडी चढउतार दिसत असली तरी शेंगदाणा व शेंगतेल चांगलेच भडकले आहे.
उन्हाळ्यात मातीमोल किमतीने विकाव्या लागलेल्या टोमॅटोमुळे शेतकºयांनी त्याची लागवडच केली नाही. परिणामी जूननंतर टोमॅटोची आवक कमालीची घटल्याने दर कडाडले. एरव्ही दहा रुपये किलो असणारा टोमॅटो एकदम ६० ते ८० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने सामान्य ग्राहक चांगलाच हबकला; पण या आठवड्यापासून तीनशे ते चारशे कॅरेटने रोज आवकेत वाढ होत असल्याने दर हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहेत. घाऊक बाजारात दर १५ ते ४५ रुपयांपर्यंत आले आहेत.
श्रावणामुळे भाज्यांच्या आवकेबरोबर मागणीही वाढली आहे. कोबी, घेवडा, गवार, भेंडीच्या दरांत थोडी वाढ झाली आहे. वांगी, ओली मिरची, ढबू, ओला वाटाणा, कारली, वरणा, दोडक्याचे दरही स्थिर राहिले आहेत. कोथिंबिरीची आवक वाढल्याने किरकोळ बाजारात दहा रुपये दर झाला आहे. बाजार समितीत मेथीच्या रोज सोळा हजार पेंढ्यांची आवक होत असून सरासरी दर पाच रुपयांपर्यंत राहिला आहे.
शेंगदाण्याच्या दरात वाढ झाल्याने शेंगतेलाचे दरही वाढले आहेत. शेंगतेल १२४ रुपये किलोपर्यंत पोहोचले असून, शाबूची मागणीही वाढली आहे. हरभरा व तूरडाळीचे दर स्थिर असले तरी मूगडाळ व उडीदडाळीच्या दरांत थोडी वाढ झाली आहे. श्रावणाच्या पार्श्वभूमीवर फळांची आवक थोडी वाढली आहे. सफरचंद, मोसंबी, पेरू, डाळिंब, सीताफळाची आवक सुरू आहे.
कांदा वधारला!
कांद्याची आवक थोडी कमी झाल्याने दर वधारला आहे. गेले सहा महिने घाऊक बाजारात कांदा सरासरी आठ रुपये प्रतिकिलोपर्यंत राहिला आहे; पण या आठवड्यात त्यात वाढ झाली असून तो चौदा रुपयांपर्यंत पोहोचला आहे. बटाटा व लसणाचे दर मात्र स्थिर आहेत.
असा आहे दरदाम, प्रतिकिलोचे -
साखर- ४२, शेंगदाणा- १००, रवा- ३०, गूळ- ५२, शाबू- ९०, शेंगतेल- १२४, सरकीतेल- ७६, तूरडाळ- ७०, मूगडाळ- ७०, हरभराडाळ- ८०.