राम मगदूमगडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेची नळपाणी पुरवठा योजना तब्बल ४२ लाखांनी तोट्यात आहे. विशेष पाणीपट्टीतून मिळणारे उत्पन्न आणि कामगार पगार, देखभाल दुरुस्ती, जलशुद्धीकरण, वीजबिल इत्यादी खर्चाचा मेळ घालताना प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यामुळे शहरवासीयांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे.आजमितीस शहराची लोकसंख्या सुमारे ३५ हजार आहे. शहरात शिकायला येणारे विद्यार्थी आणि प्रवासी मिळून सुमारे ५० हजार लोकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नगरपालिकेला करावी लागते. त्यासाठी हिरण्यकेशी नदीवर आधारित नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आली आहे. दररोज माणसी १२० लिटर पाणीपुरवठा केला जातो. मीटर पद्धतीने पाणीपट्टी आकारली जाते. पहिल्या ७५ युनिटला घरगुती वापरासाठी केवळ २४० रूपये तर वाणिज्य वापरासाठी १०५० रूपये इतकी आकारणी केली जाते. (१ युनीट म्हणजे १००० लिटर पाणी)सध्या वाढीव हद्दीतील उपनगरांसह शहरातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी देण्यासाठी सुमारे ४७ लाखांच्या नव्या नळयोजनेचे काम गतीने सुरू आहे. पाणीपुरवठा ही अत्यावश्यक सेवा असली तरी त्यावरील खर्चावर आणि सांडपाण्याच्या व्यवस्थापनावरील नियंत्रणासाठी नागरिकांनीच पुढे येण्याची आवश्यकता आहे.
दृष्टिक्षेपात नळयोजना
- शहराची लोकसंख्या : ३५८८४
- घरगुती नळजोडण्या : ८७३९
- वाणिज्य नळजोडण्या : २९०
पाणी पुरवठ्याचा लेखाजोखा २०२३-२४
- मालमत्ताकराच्या उत्पन्नापैकी १५ टक्के : ७८,२५,२९९
- विशेष पाणीपट्टीद्वारे जमा रक्कम : १,२७,३२,२४६
- नवीन नळजोडणीची जमा रक्कम : ५०,५००
- कामगार पगार, निवृत्तीवेतन, अंशदान इत्यादी : ३२,२०,४५९
- देखभाल दुरुस्ती खर्च : ६९,५७,८४३
- जलशुद्धीकरणासाठी रसायने, तुरटी, टीसीएल खरेदी : २,९४,४००
- वीजबिलाचा खर्च : १,२३,६९,८३५
- पाटबंधारेकडून घेतल्या जाणाऱ्या पाण्याची रक्कम : १९,९०,७७९
- एकूण उत्पन्न : २,०६,०८,०४५
- एकूण खर्च : २,४८,३३,३१६
- एकूण तोटा : ४२,२५,२७१
अत्यावश्यक सेवा म्हणून नफ्या-तोट्याचा विचार न करता नळपाणी पुरवठा योजना राबवली जाते. नदीतून पाण्याचा उपसा, शुद्धीकरण व देखभाल दुरुस्तीसाठी खूप खर्च येतो. त्यामुळे शुद्ध केलेल्या पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठीच करावा, शुद्ध पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची नागरिकांनी काळजी घ्यावी.- अनिल गंदमवाड, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता.