लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ताराबाई पार्क येथील भवानी अपार्टमेंट, सुर्वे कॉलनी येथे पावसाचे पाणी वाहून नेणारे मैलामिश्रित पाणी सोडले जाते. सोमवारी सकाळी असेच मैलामिश्रित पाणी सोडले असल्याचे स्थानिक नागरिकांनी दाखवून दिल्यानंतर 'आप' च्या पदाधिकाऱ्यांनी बाटलीतून आणलेले सांडपाणी उपायुक्त निखिल मोरे यांच्या निदर्शनास आणून दिले.
कावळा नाका येथून फेस्टिव्ह लॉन येथे येणारे सांडपाणी तुंबल्यास घाटगे-पाटील यांच्या बंगल्यासमोरील चेंबरमार्गे सुर्वे कॉलनीत सोडले जाते. परंतु हे पाणी फक्त सांडपाणी नसून मैलामिश्रित आहे आणि ते पाणी पुढे जाऊन पंचगंगा नदीत मिसळते, असे निदर्शनास आणून दिले.
तेव्हा उपायुक्त मोरे यांनी संबंधित चेंबर साफ करून घेऊ, असे सांगितले. फक्त चेंबर साफ करून उपयोग नाही, यावर कायमस्वरूपी उपाय काढा, असे संदीप देसाई यांनी सांगितले. पुढील चार दिवसांत जागेवर पाहणी करून उपाय काढला नाही, आणि जर पुन्हा मैलामिश्रित पाणी गटारीतून वाहले तर फौजदारी तर दाखल करू तसेच त्याच पाण्याने अधिकाऱ्यांना अंघोळ घातल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. संबंधित परिसराची पाहणी करून पुढील कार्यवाही करण्याचे आदेश उपायुक्त यांनी डॉ. प्रकाश पावरा यांना दिले.
या वेळी उत्तम पाटील, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, मयूर भोसले, विशाल वठारे, प्रथमेश सूर्यवंशी, बसवराज हदीमनी, राकेश व्हटकर उपस्थित होते.