भारत चव्हाण - कोल्हापूर‘आली रे आली, आता माझी पाळी आली’ हा हिंदी चित्रपटातील ‘डायलॉग’ सध्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेत आला आहे. गेल्या पाच-सात वर्षांत दुखावलेले नेते, नगरसेवक, कार्यकर्ते यांना एकत्र करताना ताराराणी आघाडीच्या कारभाऱ्यांनी आता हाच डायलॉग म्हणायला सुरुवात केली असून, निवडणुकीत माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील हेच ताराराणी आघाडीचे मुख्य लक्ष्य राहणार आहेत. आघाडीची तयारीही याच मुद्द्यावर सुरू आहे. महानगरपालिकेचे प्रभाग व आरक्षण निश्चित झाल्यानंतर सर्वांत अधिक गतीने ताराराणी आघाडीची तयारी सुरू झाली. दररोज बैठका, रणनीती ठरविण्यात आघाडीच्या नेत्यांचा दिवस खर्च होत आहे. सुनील मोदी, सुनील कदम, सत्यजित कदम, सुहास लटोरे असे प्रमुख चार मोहरे शहरातील प्रभाग पिंजून काढत कार्यकर्त्यांना आणि इच्छुक उमेदवारांना भेटत आहेत. गेल्या पाच वर्षांत सतेज पाटील यांच्याकडून दुखावलेले कार्यकर्ते, नगरसेवक इच्छुक उमेदवार आहेत. त्यांना भेटून आघाडीत खेचण्याचा ‘ताराराणी’चा प्रयत्न सुरू आहे. आठ दिवसांतच त्यांच्याकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. निवडणुकीची साधनं आणि निवडून येण्याची क्षमता असलेल्या मान्यवर उमेदवारांना त्यांनी आपलंसं केलं आहे. विद्यमान सभागृहात कोणतेही पद न मिळालेल्या नगरसेवकांनी तर कॉँग्रेसची उमेदवारी नकोच, असा पवित्रा घेतला आहे. सत्यजित कदम विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शहराच्या प्रत्येक मंडळापर्यंत पोहोचले आहेत. त्याचा उपयोगही करून घेण्याचा प्रयत्न होत आहे. ताराराणी आघाडीकडे सध्या संभाजीराव बसुगडे, किरण शिराळे, सत्यजित कदम, सुनील मोदी, प्रकाश मोहिते, यशोदा मोहिते, नीलेश देसाई, सरिता नंदकुमार मोरे, राजू घोरपडे, नंदकुमार वळंजू, ईश्वर परमार, आदी आजी-माजी नगरसेवकांची नावे संभाव्य उमेदवारांत घेतली जातात. रविकिरण इंगवले, प्रतिभा नाईकनवरे, प्रकाश नाईकनवरे, सई खराडे यांनी अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही.
‘ताराराणी’चे लक्ष्य सतेज पाटील
By admin | Published: August 11, 2015 1:35 AM