कोल्हापूर : परिवहन विभागाकडे (के.एम.टी.) घेण्यात येणाऱ्या १०४ बसेसचा पुरवठा करण्यासाठी दोन वेळा निविदा काढण्यात आली. निविदा काढणे व मंजुरीच्या प्रक्रियेवरून टाटा मोटर्सने केएमटी प्रशासनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी (दि. ३) सुनावणी होणार आहे. त्यानंतरच नव्या बसेसच्या खरेदीचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती आज, गुरुवारी झालेल्या केएमटी सदस्यांच्या बैठकीत दिली. अध्यक्षस्थानी सभापती वसंत कोगेकर होते.केंद्र सरकारने के.एम.टी.ला १०४ नव्या बसेस घेण्यासाठी ४४ कोटींचा निधी मंजूर केला. लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वीच के.एम.टी. प्रशासनाने बसेस खरेदीकरिता निविदा मागविल्या होत्या. पहिल्यांंदा काढलेली ही निविदा ३२ प्रवासी क्षमता असलेल्या लहान व तांत्रिकदृष्ट्या सक्षम बसेस खरेदीसाठी रद्द करण्यात आली. त्यानंतरच्या फेरनिविदेत टाटा मोटर्स (२४.७२ लाख), अशोक लेलँड (२४.६३ लाख) व व्ही. व्ही. मर्शियल व्हेईकल्स (२५.२२ लाख) (कंसातील दर प्रतिबसप्रमाणे) बसेस पुरवठा करण्यास पात्र ठरल्या. सर्वांत कमी निविदा दर आलेल्या अशोक लेलँड कंपनीला आयुक्त स्तरावर आणखी दर कमी करण्यासंदर्भात चर्चेला पाचारण करून त्यांची निविदा मंजूर केली. यानंतर टाटा मोटर्सने केएमटी प्रशासनास न्यायालयात खेचले. न्यायालयात केएमटीने म्हणणे सादर केले असून, सोमवारी अंतिम सुनावणी आहे. यावेळी झालेल्या चर्चेत यशोदा मोहिते, परीक्षित पन्हाळकर, स्मिता माळी, रेखा पाटील, राजाराम गायकवाड, जालंदर पोवार, संगीता देवेकर यांनी सहभाग घेतला.
टाटा मोटर्सची केएमटीविरोधात न्यायालयात धाव
By admin | Published: October 31, 2014 1:07 AM