कोल्हापूर : तावडे हॉटेल येथील राष्ट्रीय महामार्गालगत आरक्षित असणाऱ्या जागेवर महिन्यात ट्रक टर्मिनस महिन्यात सुरू करणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी येथे दिली.
शहरातील वाहतुकीच्या नियोजनासंदर्भात त्यांनी ट्रक टर्मिनसची जागा, गाडीअड्डा आणि शिरोली नाका येथील जागेची पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. गाडीअड्डा येथे पार्किंग आणि भक्तिनिवासाची निविदा प्रसिद्ध करण्याचे आदेशही दिले. गाड्डीअड्डा ट्रक टर्मिनस येथे स्थलांतर करण्याच्याही सूचना केल्या.कोल्हापूर शहरातील वाहतुकीच्या समस्यावर गुरुवारी शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री सतेज पाटील यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पाहणी करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार पालकमंत्री पाटील, महापौर निलोफर आजरेकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांनी गांधीनगर, तावडे हॉटेलसह शहरात पाहणी केली.पालकमंत्री पाटील म्हणाले,‘तावडे हॉटेल येथे महापालिकेची २३ एकर जागा असून यापैकी ट्रक टर्मिनससाठी जागा आरक्षित आहे. सध्या साडेतीन एकर जागा महापालिकेच्या ताब्यात आहे. त्यापैकी एक एकर जागेत महिन्याभरात ट्रक टर्मिनस सुरू करण्याचे नियोजन आहे. वीज पुरवठ्यासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल. जेसीबीच्या सहाय्याने परिसराचे तातडीने सपाटीकरण करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. उर्वरित जागेवर पीक लावले असून, ते कापून घेण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात येथील सर्वच परिसर विकसित करून शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्याचा प्रयत्न आहे.गांधीनगर परिसरातील मणेरमळा येथे महापालिकेची १ एकर जागा आहे. या जागेचीही पाहणी करण्यात आली. मात्र, या जागेत ट्रकचा प्रवेश अथवा बाहेर जाण्याचा मार्ग अडचणीचा असल्याने पुढील टप्प्यात येथील नियोजन करण्यात निर्णय झाला.
यावेळी स्थायी समिती सभापती संदीप कवाळे, उपमहापौर संजय मोहिते, गटनेते सुनील पाटील, नगरसेवक भूपाल शेटे, राहुल चव्हाण, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर, लॉरी असोसिएशनचे सुभाष जाधव, अशोक पोवार, रमेश मोरे, गणी आजरेकर, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, इस्टेट अधिकारी सचिन जाधव, आदी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले,
- ट्रक टर्मिनसचा परिसर जेसीबीच्या साहाय्याने तत्काळ सपाटीकरण करून घ्या.
- गाडीअड्डा तावडे हॉटेल येथील ट्रक टर्मिनस येथे स्थलांतर करणे,
- महापालिकेने गाडीअड्डा येथील पार्किंग, भक्तनिवासाची तत्काळ निविदा काढा
- शिरोली नाका येथील महापालिकेच्या जागा ताब्यात घेऊन आराम बस पार्किंग करणे
- वाहने पार्किंग केल्यानंतर गाडीअड्डा ते अंबाबाई मंदिरसाठी ‘ई’ कारची सुविधा करणार
- पार्किंग केलेली वाहने बाहेर जाण्यासाठी गाडीअड्डा ते विल्सन पूल मार्ग तयार करणे,
पहिल्या टप्प्यामध्ये तावडे हॉटेल परिसरातील महापालिकेच्या आरक्षित जागेत १०० ट्रक थांबतील, या क्षमतेचे ट्रक टर्मिनस करण्यात येणार आहे. शहरातील वाहतूकीची कोंडी फुटावी यासाठी जे कांही करणे शक्य आहे ते सर्व केले जाईल.सतेज पाटील, पालकमंत्री
तावडे हॉटेल येथे २३ एकर २० गुंठे जागा असून २० एकर जागा ताब्यात घेण्यासाठी प्रक्रिया केली जाणार आहे. संबंधितांना नोटीस काढून टिडीआरच्या माध्यमातून नुकसानभरपाई देऊन उर्वरित जागाही ताब्यात घेतली जाईल. शिरोली नाक्यालगत ४९ हजार स्क्वेअर फूट जागा महापालिकेची असून, या जागेचा वापर आरामबस पार्किंगसाठी करणे शक्य आहे.- नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता. महापालिका