* सोयीसुविधा राबविताना अडचणी
उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथे ल. क. अकिवाटे औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीमध्ये मोठ-मोठ्या उत्पादक व सेवा संस्था आहेत. परंतु, उदगाव ग्रामपंचायतीचा दोन वर्षांचा तब्बल साठ लाख रुपये कर थकीत असल्याने तो वसूल व्हावा यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करीत आहे, तर सर्व कारखान्यांची फेरमोजणी होऊन मूल्यांकन करून घ्यावे, आम्ही कर भरतो असे कारखानदारांचे म्हणणे आहे. एकंदरीत गावच्या विकासकामांवर याचा परिणाम होत असल्याने यावर मार्ग निघणे गरजेचे आहे.
अकिवाटे औद्योगिक वसाहतीमध्ये तब्बल १०० उत्पादक व सेवा संबंधित औद्योगिक संस्था आहेत. परंतु २०१९-२० व २०२०-२१ या वर्षीचा एकूण साठ लाख रुपये ग्रामपंचायतीचा कर थकविला आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत सदस्यांमध्ये चर्चा झाली असता कोणत्याही परिस्थितीत वसाहतीकडून कर भरून घ्यायचाच या मनस्थितीत सदस्य आहेत, तर एकूण साठ लाख करांपैकी २२ लाख रुपये देण्यास वसाहत तयार आहे, उर्वरित कर पुन्हा एकदा प्रत्येक संस्थेची मोजणी करूनच देणार असल्याची माहिती वसाहतीने दिल्याचे ग्रामविकास अधिकारी रायसिंग वळवी यांनी सांगितले.
उदगाव ग्रामपंचायतीचा एकूण १ कोटी ९२ लाख इतका कर थकीत होता. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गेल्या आठ महिन्यांत कर्मचाऱ्यांनी करवसुलीवर जोर दिला आहे. घरपट्टी व पाणीपट्टी व औद्योगिक वसाहतीचा कर यावरच ग्रामपंचायतीचा गाढा चालतो. त्यामुळे ग्रामस्थांनी कर वसुलीला सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच कलीमुन नदाफ यांनी केले आहे.
----------
वसाहतीमधील बरेचशे कारखाने हे १९८५ च्या आसपासचे आहेत. मूल्यांकन करताना २०१० प्रमाणे केले आहे. त्यामुळे फेरमोजणी करावी तद्नंतरच आम्ही कर भरू, आम्ही कर भरण्यास तयारच आहोत, अशी कारखानदारांची मागणी आहे. ग्रामपंचायतीनेही आम्हाला आजवर सोयीसुविधा दिल्या नाहीत त्यामुळे ग्रामपंचायतीनेही यावर लक्ष द्यावे.
दिलीप पाटील कोथळीकर, संचालक, ल. क. अकिवाटे वसाहत