इचलकरंजी : येथील नगरपालिकेकडील करवसुली विभागाने २५ कोटी २५ लाख २६ हजार १६३ रुपयांची वसुली केली असून, ८१.१० टक्के महसूल मिळविला आहे. घरफाळा व पाणीपट्टीच्या वसुलीसाठी विशेष मोहीम उघडून येथील वस्त्रोद्योगातील आर्थिक मंदी व नोटाबंदी यासारख्या अडचणींवर मात करून हा कर वसूल केला आहे. त्यासाठी करवसुली पथकाने नळ पुरवठा तोडणे व मालमत्ता सील करणे अशा कडक कारवाया केल्या.मागील आर्थिक वर्षात घरफाळ्यासाठी चतुर्थ वार्षिक कर आकारणी होती. त्यापाठोपाठ नगरपालिका निवडणूक, वस्त्रोद्योगात असलेली आर्थिक मंदी आणि नोटाबंदी यासारख्या आव्हानांना सामोरे जावे लागत होते. तरीसुद्धा घरफाळा व पाणीपट्टी वसुलीसाठी अखेरच्या तीन महिन्यांत १०५ नळ पुरवठा जोडण्या तोडण्यात आल्या. तसेच अकरा मालमत्ता सील केल्या. याचा परिणाम म्हणून एका मार्च महिन्यात ११ कोटी ४० लाख रुपयांची वसुली मिळाली.या वसुलीसाठी १०७ कर्मचारी असलेली सात पथके नेमण्यात आली होती. यंदा कॅशलेस व्यवहारासाठी नऊ पॉस यंत्रांचा वापर केला गेला, अशी माहिती अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे यांनी दिली.चतुर्थ कर आकारणीनंतर २१ कोटी १३ लाख ६८ हजार २३३ रुपये इतकी मागणी होती.त्याचबरोबर मागील थकबाकी ६० कोटी ५५ लाख ८ हजार ५७४ रुपये होती. त्यापैकी मागील थकबाकीचे ३ कोटी १९ लाख २३ हजार १२४ रुपये वसूल करण्यात आले. तसेच चालू मागणीपैकी २५ कोटी २५ लाख२६ हजार १६३ रुपयांची वसुली झाली, असे प्रभारी कर अधिकारी जानबा कांबळे यांनी सांगितले. शासकीय इमारती व न्यायप्रविष्ट असलेली करवसुली वगळता यंदाची झालेली करवसुली ९१ टक्क्यांहून अधिक असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)
इचलकरंजीत २५ कोटींची करवसुली
By admin | Published: April 12, 2017 12:38 AM