संजय पाटील- सरुड -अनेकजण कोणत्या ना कोणत्या तरी उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करत असतात. असाच प्रयत्न शिंपे (ता. शाहूवाडी) येथील सर्जेराव काळे व जयश्री काळे या शिक्षक दांपत्याने ‘लेक वाचवा’ या उपक्रमाद्वारे केला आहे. गावात जन्माला आलेल्या सात मुलींच्या नावे प्रत्येकी एक हजार रुपयांची ठेव पावती ठेवून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.समाजाच्या ऋणातून थोडेफार का होईना उतराई होण्यासाठी गावात जन्मास येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे १००० रुपयांची ठेव पावती ठेवण्याचा आदर्श उपक्रम काळे दाम्पत्याने हाती घेतला आहे. १५ आॅगस्ट २०१४ ते २६ जानेवारी २०१५ या पहिल्या टप्प्यात जन्माला आलेल्या सात मुलींच्या नातेवाईकांकडे ठेव पावत्या सुपूर्द केल्या आहेत. योगायोग म्हणजे यातील तीन मुलींची नावे ‘स्वरा’ अशी आहेत. या सात मुली म्हणजे शिंपे गावातील सप्तसिंधू असून त्यांनी देशात आपले नाव कमवावे अशी भावना काळे दाम्पत्याने व्यक्त केली आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील ठेव पावत्या १५ आॅगस्ट २०१५ ला देण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर संशयित मुलींना ठेव पावती मोडता येणार आहे. म्हणजे तो त्यांनाच सहीचा अधिकार आहे. या ठेव पावत्या सरपंच अन्वर पाटील, नामदेव पाटील, सदाशिव पाटील, बाजीराव पाटील, मंदा पाटील, बाबासोा पाटील, मुख्याध्यापक बाबूराव यादव ग्रामसेवक योगेश भोसले यांच्या उपस्थितीत मुलीच्या पालकांकडे सुपूर्द केल्या. काळे दाम्पत्याच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
शिक्षक दांम्पत्याचा ‘लेकीं’ना आधार
By admin | Published: February 19, 2015 12:20 AM