राम मगदूमगडहिंग्लज : गडहिंग्लजच्या आठवडा बाजारात रस्त्यावर सापडलेले ३ लाख रूपये संबंधित व्यापाऱ्याला परत देवून त्यांनी विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षणाचा धडा आपल्या कृतीतून देत अजूनही प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचे समाजाला दाखवून दिले. राजीव बसवंत सुतार असे त्या प्रामाणिक शिक्षकाचे नाव आहे.हकीकत अशी, सुतार हे गडहिंग्जल तालुक्यातील माद्याळ कसबा नूल येथील रहिवाशी होत. थोर गांधीवादी दिवंगत मा. ना. कुलकर्णी यांनी सुरु केलेल्या दुंडगे येथील परिश्रम विद्यालयात त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. त्याच शाळेत ते सहाय्यक शिक्षक म्हणून काम करतात.आठवडा बाजारासाठी रविवारी ते गडहिंग्लजला आले होते. येथील लक्ष्मी रोडवर पायी फिरून बाजार करताना रस्त्यावर त्यांच्या पायाला एक जड प्लास्टिक पिशवी लागली. पिशवी उचलून पाहिले असता त्यात १००, ५०० व २ हजाराच्या नोटा होत्या.तात्काळ त्यांनी आपला बाजारहाट थांबवला आणि ती पिशवी आपल्या पिशवीत सुरक्षित ठेवून ‘त्या’ पिशवीच्या मालकाचा शोध घ्यायला सुरुवात केली. दरम्यान, मोठी रक्कम हरविल्यामुळे भांबावलेला एक माणूस समोरून येताना त्यांना दिसला. विचारपूस केल्यानंतर त्याने आपली पिशवी हरवली असून ‘त्या’ पिशवीत ३ लाख रूपये असल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांनी मिळून एका दुकानाच्या कट्टयावर बसून पिशवीतील रक्कम मोजली.‘ती पिशवी’ खानापूर (जि) बेळगाव येथील रामाप्पा हुक्केरी या व्यापाऱ्याची होती. आठवडाभर पुरवलेल्या मालाची रक्कम गोळा करून गावी जाताना त्यांची हातातून ती रस्त्यावर पडली होती. मोजल्यानंतर रक्कम तेवढीच भरल्याने ती पिशवी हुक्केरी यांचीच असल्याची खात्री झाल्याने सुतार यांनी ती त्यांना परत दिली. त्यातील ५ हजार रूपये त्यांनी त्यांना बक्षीस म्हणून देवू केली. परंतु, त्यांनी ती नम्रपणे नाकारली.शेतमजूर कुटुंबातील आई-वडिलांच्या घट्ट संस्कारामुळेच आपल्याकडून ही कृती घडली. दुसऱ्याच्या वस्तूला हातसुद्धा न लावण्याची शिकवण देणारे वडील आज हयात असते तर त्यांना खूप आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया सुतार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली
चांगुलपणा माणसाच्या हृदयात असावा लागतो. मूल्याबरोबर तडजोड म्हणजे दुसऱ्याबरोबर स्वत:च्याही नजरेतून उतरल्यासारखे असते. परंतु, गलेलठ्ठ पगार असणारी, मोठ्या हुद्यावरील माणसंदेखील लाच खात असताना आणि मेडिकल आॅफिसर म्हणून काम करताना ३० रूपयांची लाच घेताना डॉक्टरही सापडतो अशा काळात सुतार यांच्यासारखे कृतीशील शिक्षक समाजाला दीपस्तंभासारखे आहेत.- संपत गायकवाड, निवृत्त सहसंचालक, शिक्षण विभाग कोल्हापूर.