दोन वर्षांपूर्वी सुगम आणि दुर्गम क्षेत्र अशी विभागणी करीत सुगममधील शिक्षकांच्या दुर्गममध्ये बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, अनेकांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकत खरोखरच डोंगराळ नसलेली गावे दुर्गममध्ये टाकून आपल्या संबंधितांच्या बदल्या करण्याचा घाट घातला. एकूणच या धोरणातील विसंगती मांडत एक वर्ष शिक्षक संघटना राज्य शासनाशी भांडत होत्या. परंतु, त्यातून मार्ग निघाला नव्हता.
आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व शिक्षक संघटनांशी चर्चा करून बदल्यांचा आदेश काढला आहे. ज्या शिक्षकांची १० वर्षे सेवा सर्वसाधारण क्षेत्रात आणि एकाच शाळेत पाच वर्षांत झाली आहे अशांच्या बदल्या अवघड क्षेत्रात करण्यात येणार आहेत. सर्वसाधारण क्षेत्रात ज्यांची अधिक सेवा झाली अशांना प्राधान्याने अवघड क्षेत्रात पाठविण्यात येणार आहे. अवघड क्षेत्र ठरविण्यासाठी आठ निकष देण्यात आले असून, त्यातील तीन निकष पूर्ण केले तरी ते गाव अवघड क्षेत्रात गृहीत धरण्यात येणार आहे.
संवर्ग १ व २ या गटातील बदल्या दरवर्षी केल्या जात होत्या. तसेच पती-पत्नी सोय या बदल्याही दरवर्षी केल्या जात होत्या. त्यामध्ये बदल करून एकदा बदली झाल्यानंतर तेथून तीन वर्षांनंतरच त्यांची पुन्हा बदली केली जाणार आहे. पती-पत्नी बदली झाल्यानंतर पुन्हा बदल करताना एक युनिट समजून दोघांचीही बदली केली जाईल.
चौकट
अवघड क्षेत्रासाठीचे निकष१
१. वार्षिक पर्जन्यमान तीन हजार मिमीपेक्षा जास्त
२. नैसर्गिक आपत्तीमुळे संपर्क तुटणारे गाव
३. हिंस्त्र वन्यप्राण्यांचा उपद्रव असणारा जंगलव्याप्त प्रदेश
४. वाहतुकीच्या सुविधांसह रस्त्यांचा अभाव
५. रस्त्याने न जोडलेल्या शाळा, बस, रेल्वे व इतर वाहतुकीने न जोडलेल्या.
६. संवाद छायेचा प्रदेश बीएसएनएलच्या अहवालानुसार
७. डोंगरी भार प्रदेश
८. राष्ट्रीय, राज्य मार्गापासून १० किलोमीटरपेक्षा जास्त दूर
चौकट -
अवघड क्षेत्र ठरविण्यासाठी समिती
मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष
उपजिल्हाधिकारी निवडणूक
कार्यकारी अभियंता जि. प. बांधकाम
कार्यकारी अभियंता सार्व. बांधकाम विभाग
विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ
प्राथमिक शिक्षणाधिकारी सदस्य सचिव
कोट
ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या बदल्यांचा काढलेल्या आदेशाचे आम्ही स्वागत करतो. यामध्ये अवघड क्षेत्र ठरविण्याबाबत काही सुधारणा केलेल्या आहेत. संवर्ग १/२ व पती-पत्नी सोय यातही सुधारणा करण्यात आल्या आहेत.
राजाराम वरुटे
राज्याध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ.