शाहूवाडीचे सभापती विजय खोत यांनी गुरुवारी दुसऱ्या दिवशीही तालुक्यात शाळा भेटीची धडक मोहीम राबवून १३ शाळांना अचानक भेटी दिल्या. यामध्ये तीन शाळा कुलूपबंद असल्याच्या, तर उर्वरित दहा शाळेतील १३ शिक्षक अनधिकृतपणे गैरहजर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले .
सभापती खोत यांनी गुरुवारी दिवसभरात तालुक्यातील बुरंबाळ, कुंभवडे, नवलाईदेवीवाडी, पारिवणे, गेळवडे, गेळवडे पैकी बौद्धवाडी, येळवण जुगाई पैकी मालाईवाडा, म्हालसवडे धनगरवाडा, पांढरेपाणी, मोसम, शेंबवणे, धुमकवाडी, कुंभ्याचीवाडी येथील शांळाना भेटी दिल्या. यामध्ये शेंबवणे, धुमकवाडी, कुंभ्याचीवाडी येथील शाळा कुलूपबंद असल्याच्या दिसून आल्या. या शाळेतील सर्वच शिक्षक गैरहजर होते, तर उर्वरित दहा शाळेतील एक, दोन याप्रमाणे एकूण १३ शिक्षकांनी अनधिकृतपणे गैरहजर राहत दांडी मारल्याचे निदर्शनास आले. सभापती खोत यांच्या या धडक मोहिमेदरम्यान सलग दुसऱ्या दिवशीही दांडीबहाद्दर शिक्षकांनी आपल्या कर्तव्यात कसूर करत शाळेला दांडी मारल्याचे दिसून आले.