कोल्हापूर : प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षक व शिक्षिका ‘कोरोना योद्धा’ म्हणून आपल्या प्रभागात काम करणार आहेत. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची प्राथमिक शिक्षण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी रविवारी बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. आयुक्त डॉ. कलशेट्टी यांची शिक्षक व शिक्षिकांना ‘कोरोना योद्धा’ म्हणून काम करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देऊन सुट्टीच्या कालावधीतही सर्व शिक्षक व शिक्षिकांनी आपल्या प्रभागात कोरोना योद्धा म्हणून काम करण्यास तयारी दर्शविली. सध्या ४० शिक्षक सर्वेक्षणाचे कामकाज करीत आहेत. आता उर्वरित शिक्षक आपल्या प्रभागात होम क्वारंटाईन व संस्थात्मक अलगीकरण असलेल्या नागरिकांवर देखरेख ठेवतील. कोरोनाबाबत प्रभागात जनजागृती करून प्रबोधन करतील. ५० वयावरील व्यक्तीला ‘महाआयुष’ उपक्रमामध्ये सहभागी करून घेतील, असे संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले.
आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी, नागरिकांनी प्रत्येक प्रभागामध्ये माहिती घेण्यासाठी येणाऱ्या शिक्षक (कोरोना योद्धा) व सर्वेक्षणासाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याला माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही केले आहे. यावेळी शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी शंकर यादव, प्राथमिक शिक्षक संघटनेचे संजय पाटील, सुधाकर सावंत, सुमित गणबावले, द्रोणाचार्य पाटील, संतोष बावले उपस्थित होते.