कोल्हापूर : पाचगाव आश्रमशाळेतील अधीक्षक व विद्यार्थ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्याची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने संतप्त नातेवाइकांनी आज, मंगळवारी अधीक्षकासह शिक्षकांना बेदम मारहाण केली. त्याचबरोबर नातेवाइकांनी राजारामपुरीतील खासगी रुग्णालयासमोरही गोंधळ घातला. भारतीय भटके, विमुक्त, विकास व संशोधन संस्था, सातारा या संस्थेची पाचगाव येथे राजर्षी छत्रपती शाहू माध्यमिक आश्रमशाळा आहे. या शाळेत नववीमध्ये शिकणारा विद्यार्थी सूरज शामराव पवार (वय १७, रा. शांतीनगर, उचगाव, ता. करवीर) याच्यावर चोरीचा आळ घातल्याने त्याने दि. ३० डिसेंबर २०१४ रोजी राहत्या घरी पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी गंभीर जखमी अवस्थेत त्याला नातेवाइकांनी राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. नातेवाइकांनी शाळेचे अधीक्षक व इतर दोन विद्यार्थ्यांविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आज सूरज याची प्रकृती अत्यवस्थ झाल्याचे समजताच उचगाव येथील दोनशेपेक्षा जास्त ग्रामस्थ, नातेवाईक रुग्णालयासमोर आले. तेथून ते थेट पाचगाव आश्रमशाळेमध्ये घुसले. याठिकाणी अधीक्षकासह शिक्षकांना बेदम मारहाण केली.
आश्रमशाळेच्या अधीक्षकासह शिक्षकांना मारहाण
By admin | Published: January 07, 2015 12:52 AM